(महाड)
रायगड जिल्ह्यातील महाड येथे पती पत्नीच्या भांडणातून पत्नीने आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये, दीड वर्षीय चिमुरडीसह एकूण सहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महाड तालुक्यातील ढालकाठी गावात विहिरीत ढकलून मुलांचा जीव घेण्याची हृदयद्रावक घटना काल सायंकाळी उशिरा घडली. या मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर या महिलेनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. रुना चिखुरी सहानी (वय ३० ) असे या महिलेचे नाव आहे. चिखुरी साहनी हा पत्नी आणि सहा मुलांसोबत महाड तालुक्यातील शेलटोली येथे राहत होता. चिखुरी हा बिगारी काम करायचा तर पत्नी रुणा ही गृहिणी होती. दरम्यान, चिखुरी हा दारू पिऊन पत्नीची छळवणूक करीत असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास पती पत्नीचे भांडण झाले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रुना हिने रागाने बोरगाव येथील विहिरीत पाच मुली आणि तीन वर्षीय लहान चिमुरड्याना विहिरीत फेकले. तर, त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास रुना हिने या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यावेळी, पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
रोशनी चिखुरी सहानी (वय १०), करिष्मा चिखुरी सहानी (वय ८), रेश्मा चिखुरी सहानी (वय ६), विद्या चिखुरी सहानी (वय ५ ), शिवराज चिखुरी सहानी (वय ३) आणि राधा चिखुरी सहानी (वय दिड वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. प्रथम पाच मुली आणि मग एका मुलाला विहिरीत ढकलून दिले असे त्या महिलेने सांगितले.
रात्री दहा वाजेपर्यंत सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांसह महाडचे आमदार घटनास्थळी यावेळी जातीने उपस्थित होते. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महिलेचा जीव वाचला असला तरी यामध्ये सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.