(रायगड / चंद्रकांत कोकणे)
पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात नागरिक तसेच वाहनचालकांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाला महाड तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या कार्यक्रमात भाषण देत असताना पोलिसांनी या तोतया उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
अटक केलेल्या या तोतया उपनिरीक्षकाचे नाव अनिकेत मेस्त्री वय २२ वर्षे असे असून तो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आनंदनगर भागामध्ये रहात आहे. महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये गेले काही महिन्यांपासून हा तोतया उपनिरीक्षक नागरिक व वाहनचालकांची फसवणूक करत होता. तर काही वाहन चालकांकडून त्यांनी पैसेही उकळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेले काही महिन्यांपासून पोलीस या तोतयाचा शोध घेत होते. १४ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास महाड तालुक्यातील नागाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेत एका कार्यक्रमांमध्ये हा तरुण पोलिसांची वर्दी परिधान करून कमरेला पिस्तोल तसेच खांद्यावर स्टार आणि उपनिरीक्षकाची नेम प्लेट लावून या ठिकाणी उपस्थित होता. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच विद्यार्थी वर्गासमोर आपण पोलिस असल्याचे बतावणी करून भाषण देत असताना पोलिसांनी या तोतया तरुण उपनिरीक्षकाला अटक केली आहे. याबाबत शाळेतील शिक्षक संतोष जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या तोतया उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.