(नवी दिल्ली)
काँग्रेसने देशव्यापी आंदोलन करत महागाईसह बेरोजगारी आणि ईडीविरोधात केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले. काँग्रेसने शुक्रवारी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आंदोलन जाहीर केले होते. या आंदोलनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते दिल्लीत जमा झाले.
काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद् भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढलेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी रोखला. त्यानंतर मोदी सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांनी नारेबाजी केली. यावेळी आंदोलन करत असताना पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह रस्त्यावर ठिय्या मारून बसलेल्या काँग्रेस सचिव प्रियांका गांधी वाड्रा व अन्य काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातदेखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन परिसरात काँग्रेसने आंदोलन केले.
राजकरणी व्यक्ती किंवा नेतेमंडळी शक्यतो पांढऱ्या कपड्यात नजरेला येतात. मात्र या आंदोलनावेळी सर्व काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान केले होते. राहुल गांधींची साथ देण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रियंका गांधी यांना यावेळी पोलिसांनी ओढत पोलीस व्हॅनमध्ये नेले. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला. प्रियंका गांधींनी रस्त्यावरच धरणे दिले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.