( रत्नागिरी / प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन ही योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार शाळेतच विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून दिला जातो. हा आहार शिजवणार्या महिलांना मात्र महिन्याचे मानधन तुटपुंजे दिले जाते. म्हणजेच महिन्यासाठी त्यांना 1500 रुपये दिले जातात. महागाईच्या या काळात या 1500 मध्ये खर्च कसा भागवायचां असा प्रश्न आहार शिजवणार्या महिलांमधून विचारला जात आहे.
आहार शिजवून देणार्या महिलांना शासनाकडून मिळणारे मानधन अगदीच तुटपुंजे असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. परंतु शाळेतील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत यासाठीच या महिला आहार शिजवून देण्याचे काम करत आहेत.
शाळा मुख्याध्यापकांना ग्रामीण भागातही एवढया तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी महिला मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. ग्रामीण भागात महिलांच्या मजुरीचा दर 250 रुपये आहे. 250 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिन्याला मजुरीतून मिळत असतील तर पोषण आहाराच्या मिळणार्या तुटपुंज्या 1500 रुपयांसाठी महिला काम करण्यास येणार कशा? असा प्रश्न विचारला जात आहे.
शासनाकडून आज ना उद्या मानधन वाढेल या आशेवर पोषण आहार शिजवणार्या महिला काम करत आहेत.