(मुंबई)
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदाराच्या नियुक्तीचा वाद चांगलाच पेटला होता. विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना का मंजुरी दिली नाही, याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानपरिषदेसाठी १२ आमदारांच्या जागांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नावं पाठवली होती. मात्र, पदावरून पायउतार होईपर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी या १२ आमदारांबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकदा कोश्यारींवर टीकास्र डागलं होतं. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आता भगतसिंह कोश्यारींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालपदाच्या शेवटपर्यंत निर्णय का घेतला नाही? या प्रश्नावर भगतसिंह कोश्यारींनी सांगितले की, याबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळ मला नेहमी भेटायला येत होती. त्यांना मी उद्धव ठाकरे सरकारने लिहिलेले पाच पानांचं पत्र दाखवलं. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पत्र लिहून तुम्ही राज्यपालांना धमकी देत कायदे सांगता व शेवटी लिहिता की, १२ जणांच्या नावांना १५ दिवसांत मंजुरी द्या. असं कुठल्या घटनेत लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगतात या मुदतीत नावांना मंजुरी द्या… कधीतरी ते पत्र समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. सरकारच्या प्रस्तावावर दुसऱ्याच दिवशी मी सही करणार होतो, मात्र या पत्रामुळे मी त्या १२ आमदारांची नावे प्रलंबित ठेवली, असा खुलासा भगतसिंह कोश्यारींनी केला आहे.
उद्धव ठाकरे संत माणूस आहेत. बिचारे कुठं राजकारणात पडले. माणूस जर सरळमार्गी, सज्जन नसता, राजकारणी असता, शरद पवारांसारख्या राजकारणातील काही ट्रिक माहिती असत्या, तर असं लिहलं असतं का? चार ओळीत लिहून पाठवलं असतं. तर, सही करणं मला भाग पडलं असतं, असंही भगतसिंह कोश्यारांनी म्हटलं आहे. मला आमदार येऊन सांगायचे की, ते शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले आहेत. उद्धव चांगले माणूस होते मात्र त्यांचे सल्लागार कोण होते, ज्यांच्यामुळे ते अडचणीत अडकले. व त्यांचेमुळेच उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ असल्याचा उल्लेख भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं होतं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच आणि सत्तेतून खाली खेचलं, असा घणाघात भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. कोश्यारी म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता, असा टोलाही कोश्यारी यांनी लगावला. उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो असे ते पुढे म्हणाले.
कोश्यारींना यावेळी उतरवले होते विमानातून –
भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांना मसुरी येथे आयएएस अॅकॅडमीच्या एका कार्यक्रमासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचं होतं. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून खाली उतरावं लागलं होतं. त्यानंतर भाजपसह विरोधकांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली होती.