रत्नागिरी :- महसूल व एमटीडीसी या दोन विभागांमध्ये असलेल्या वादातून महसूल विभागाने रत्नसागर बीच रिसॉर्टला सील केले आहे. मात्र आम्ही त्या ठिकाणी तब्बल ११ कोटींची गुंतवणूक केली आहे, त्याचे काय, असा प्रश्न उपस्थित करीत एका बाजूला राज्य सरकार कोकणात पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा करीत आहे तर दुसर्या बाजूला असलेले व्यवसाय बंद केले जात आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम पर्यटनावर व येथील महसूल रोजगारावर होत असल्याचे रत्नसागर बीच रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रतापसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नसागरच्या जागेमध्ये प्रथम आठ कोटी व पुन्हा मुदत वाढवून दिल्यानंतर तीन कोटी रुपये नुतनीकरण व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्यात आले आहेत. गेले पाच महिने हे रिसॉर्ट बंद असल्याने खर्च वाया जात आहे. महसूल व एमटीडीसीमधील वादाचा फटका आम्हाला का असा प्रश्नही प्रतापसिंह सावंत यांनी उपस्थित केला. यासंदर्भात आपण पर्यटन राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांचीही भेट घेवून संबंधित प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे त्यांनी साांगितले.