(मुंबई)
सध्या या ऑनलाईन जमान्यात काय घडेल हे कोणच सांगू शकत नाही. अशाच एका प्रकरणात मुंबईतील खारमध्ये एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. ऑनलाइन संकेतस्थळावर मसाजर शोधताना एका व्यक्तीला आपली पत्नी व बहिणीचे फोटो एस्कॉर्ट साइटवर दिसून आले. हे पाहून संबंधित व्यक्तीला धक्का बसला. एका मसाज साइटवर पत्नी व बहिणीचे फोटो पाहून व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. बहिणीचे व पत्नीचे फोटो अशा साइटवर आले कुठून, हे त्याला समजेना. पत्नी व बहिणीने हे फोटो तीन ते चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केल्याचे सांगितले.
त्यानंतर याचा संबंधित व्यक्तीने स्वत: शोध घेतला असता धक्कादायक सत्य समोर आले. एका रेश्मा यादव नावाच्या महिलेने त्याच्या बहिणीचे व पत्नीचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर खात्यावरून डाऊनलोड करून अश्लील साईटवर टाकल्याचं प्रकरण समोर आले. या प्रकरणाच्या तळीशी जाण्यासाठी त्या व्यक्तीने एस्कॉर्ट साइटवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क केला असता समोरून रेश्मा यादव नावाची महिला बोलत असल्याचं समजलं. मसाजर शोधणाऱ्या या व्यक्तीने पत्नी व बहिणीला सोबत घेऊन या प्रकरणाचा छडा लावला अन् आरोपी महिलेला पकडून पोलिसांच्या हवाली केले. आरोपी महिलेने याआधीही शहरातील अनेक सुंदर महिलांचे व तरुणींचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून घेऊन ते एस्कॉर्ट व मसाज साइटवर टाकल्याची कबुली दिली आहे.
मसाज बाबत चर्चा करण्यासाठी महिलेने त्या व्यक्तीला खारमधल्या एका हॉटेलवर चर्चेसाठी बोलावले. ती व्यक्ती पत्नी आणि बहिणीला सोबत घेऊन हॉटेलवर पोहोचली. रेश्मा तेथे आल्यानंतर तिघांनीही “त्या” साइटवर अपलोड केलेल्या फोटोजबद्दल त्या महिलेला विचारले असता ती वाद घालू लागली. महिलेने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिघांनीही महिलेला पकडून पोलीस ठाण्यात नेले.
रेश्मा नावाच्या महिलेने सोशल मीडियावरून अनेक महिलांचे फोटो घेऊन एस्कॉर्ट साइटवर टाकल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी रेश्माला अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन तिला कोठडी सुनावली आहे.