(खेड)
भरणे खेड येथील अभिनेत्री सिद्धी पाटणे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ५ मे २०२३ रोजी नवीन चित्रपट मराठी पाऊल पडते पुढे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने अनेक चित्रपट ( एक होता माळीण, चौरंग, मी शिवाजी पार्क, चंद्री व भाई बंदू भिडू) टिव्ही सिरियल (विठू माउली, श्री गुरुदेव दत्त, सांग तू आहेस का? व योग योगेश्वर जय शंकर), तसेच द मास्क या वेब सीरिज व अनेक जाहिरातीत काम केले आहे. तिला मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान,आगामी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाच्या निव्वळ नफ्यातून उपलब्ध होणारा ९० टक्के निधी वृद्धाश्रमाच्या उभारणीकरिता आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत म्हणून उपयोगात आणला जाणार आहे. उर्वरित केवळ १० टक्के नफा हा कलावंतांना मोबदला म्हणून दिला जाणार आहे. या निमित्ताने, या चित्रपटाच्या चमूने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.
येत्या ५ मे रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मराठी चित्रपट पडद्यावर येत आहे. अलीकडेच झालेल्या या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात या चित्रपटाचे निर्माते.प्रकाश बाविस्कर यांनी ही बाब जाहीर करत, मराठी तरुणांनी उद्योगाकडे वळावे, असा संदेश आम्ही या सिनेमातून देत आहोत, असेही तिने स्पष्ट केले.
चिराग पाटील, सिद्धी पाटणे, अनंत जोग, सतीश पुळेकर, संजय कुलकर्णी, सतीश सलागरे आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. तर स्वप्नील मयेकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.