(हिंगोली)
मराठा समाजाने सर्व पक्षांना, नेत्यांना मोठे केले आहे. मात्र आता मराठा समाजाला न्याय द्यायची वेळ आल्यावर नकार का दिला जात आहे? असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. तसेच, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विचारात बदल केला पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले. मंत्री छगन भुजबळ मोठे नेते आहेत. त्यांना मोठे करण्यामध्ये मराठा समाजाचाही वाटा आहे. मात्र त्यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणे चुकीचे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृतीसाठी जरांगे-पाटील सध्या संवाद दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त रविवारी त्यांनी हिंगोलीत पत्रकारांशी संवाद साधला.
आज जो मराठा समाज भुजबळांच्या बाजूने आहे, त्यांची मने नक्कीच दुखावली गेली आहेत. सरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन समाजाचे उपकार फेडले पाहिजेत, अशी अपेक्षा जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली. मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज सर्वच पक्षांना, नेत्यांना मोठे करीत आला आहे. आता आम्हाला आरक्षण द्यायचे तर सर्वांनी आरक्षण न देण्याचा ठेका का घेतला? असा सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला. मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र सरकारची आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच नाही. सरकारने आयोग स्थापन केले होते. त्यानंतरही आरक्षण मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आता सर्व समाज एकत्र आला असून, आमच्या हक्काचे आरक्षण आम्ही एकजुटीने शांततेच्या मार्गाने मिळविणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांनी विचारपूर्वक बोलावे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यांनी दोन समाजात द्वेष निर्माण होईल असे बोलू नये. त्यांनी बोलताना विचारपूर्वक बोलावे. सत्ताधाऱ्यांनी सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे. आंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केल्यानंतर उपोषण सोडण्यासाठी सरकारने अनेक डाव टाकले होते. मात्र त्यांचे सर्व डाव उधळून लावले. सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नाही, असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.