(छ. संभाजीनगर)
सन १८८१ च्या जनगणनेत सर्वाधिक कुणबी म्हणून मराठवाड्यात नोंद होती. कालांतराने हैद्राबाद निजाम संस्थान १९६० ला गेल्यानंतर या नोंदी कमी कमी होत गेल्या. २०० ते ३०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मराठा पंच मंडळाकडे या जुन्या नोंदी आहेत. तेव्हापासून या पंच मंडळाकडे निजामकालीन जुनी भांडी आहेत. भांडी तांब्यांची आहेत. ज्यावर स्पष्टपणे कुणबी म्हणून उल्लेख आहे.
मराठा आरक्षण समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, या दौऱ्यात मराठा समाजाकडे असलेले कुणबी नोंदीचे पुरावे त्यांनी सादर करण्याचे आवाहन या समितीकडून करण्यात आले होते. दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचलेल्या समितीसमोर मराठा समाजाकडून कुणबी असल्याचे अनेक पुरावे सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी कुणबी नोंद असलेल्या भांडीकुंडी देखील यावेळी पुरावे म्हणून समीतीच्या समोर दाखवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या मराठा आरक्षण समितीसमोर मराठा समाजाकडून पुरातन भांडी सादर करण्यात आल्या असून, ज्यावर कुणबी असल्याच्या नोंदी आहे. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या या जुनी भांडी आहेत. त्या काळात भंडारा किंवा लग्नात अशी मोठ-मोठी भांडी वापरली जात होती. विशेष म्हणजे ही भांडी वैयक्तिक नव्हत्या, त्या समाजाच्या सर्वजनिक कार्यक्रमात वापरल्या जात होत्या. त्यामुळे त्यावर कुणबी अशा नोंदी करण्यात आल्या होत्या. तर, ही पुरातन भांडे आणि त्यावर कुणबी नोंदी लक्षात घेता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
पूर्वीचे मराठा हे मुळचे कुणबीच आहेत. खासरा पत्राच्या नोंदीनुसार सुध्दा शेती व्यवसाय करणारे मराठा समाजाचे लोक हे कुणबी म्हणून ओळखले जातात. बेगमपुऱ्यातील अनेक नागरिकांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबी अशी नोंद आहे. आजही लग्न कार्यात पत्रिका न वाटता आमंत्रण देण्याची पारंपरिक पध्दत चालू आहे. या जुन्या भांड्यांवरील नोंदी मराठा कुणबी एकच असल्याबाबतचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी मराठा पंच मंडळाने समितीकडे केली आहे.