(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्याती मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री माधव अंकलगे, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दिनांक 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध कार्यक्रम महाविद्यालयाने आयोजित केले आहेत. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आज क्रांती दिननिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन केले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अगणित वीरांनी आपले सर्वस्व अर्पण केले. आपली माणसे, घर- दार, संसार यावर तुळशीपत्र ठेवून अनेकांनी आपलं आयुष्य पणाला लावले. असे अनेक वीर योद्धे क्रांतिकारक आहेत की ज्यांचे आज नावही आपण घेत नाही. ते आपल्या विस्मृतीत गेले आहेत. त्यांची माहिती अतिशय त्रोटक स्वरूपातच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात दिली जाते.
आजच्या तरुणाईने अशा क्रांतिकारकांनी देशासाठी काय केले हे वाचणे, ऐकणे अतिशय आवश्यक आहे. बटूकेश्वर दत्त, अनंत कान्हेरे, विष्णू गणेश पिंगळे, रंगो बापूजी, अमरेंद्र नंदी, विना दास, लक्ष्मण चाकी, लक्ष्मीस्वामिनाथन, उधम सिह, गणेश दास, सेतू माधव पगडी, बाल मुकुंद, जतीन दास, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिह,एवढेच नाहीत तर अशा अनेक वारांनी आपले योगदान दिले. त्यांची माहिती करून घ्या असे प्रमुख वक्ते श्री. माधव अंकलगे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या साधनांचा वापर हा ज्ञान मिळविण्यासाठी करणे आवश्यक आहे. मोबाईल, संगणक ही विज्ञानाची देणगी आहे, तिचा वापर हा जास्तीत जास्त आपल्या अभ्यासासाठी करावा, आणि पुस्तकांबरोबरच याही माध्यमातून या अज्ञात असलेल्या क्रांतिकारकांची माहिती करून घ्यावी, असे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये यांनी सांगितले.
आपल्या मायभूमीला पारतंत्र्यातून सोडविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, पण राजकारणासाठी फक्त काही जनांनाच नको तितकी प्रसिद्धी मिळाली आणि बाकीचे इतिहासातच खितपत पडले. त्यांचीही ओळख विद्यार्थ्यांना व्हायला हवी, त्याचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून देशासाठी कोणत्याही प्रकारची त्यागाची भावना निर्माण केली पाहिजे, असे इतिहास विभाग प्रमुख प्रा. गणेश कुळकर्णी यांनी आपले मत मांडताना अधोरेखित केले.