(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे इयत्ता बारावीचे इंग्रजी विषयाचे विशेष मार्गदर्शन शिबीर कोल्हापूर येथील नामांकित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने यशस्वीपणे संपन्न झाले.
या शिबीरात पंचक्रोशीतील सव्वा तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे डॉ. नानासाहेब मयेकर यांनी हे शिबीर सुरू केले होते. शिरीष मुरारी मयेकर या नावाने इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन शिबीर घेतले जाते. हे मार्गदर्शन इ. बारावीच्या सहभागी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरले . हे शिबीर ६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते . चाफे पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय सुलभ जावा, बोर्ड परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने पेपर कसा सोडवायचा याविषयीची कौशल्य सांगण्यात आली. हे एकदिवसीय शिबीर गेली १४ वर्षापासून सुरू आहे.
या शिबीरासाठी कोल्हापूरहून या विषयातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.यामध्ये श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूरचे अनुभवी , माजी प्राध्यापक उमेश अपराध, द न्यू कॉलेजचे प्राध्या.एस.एल.पाटील, देवचंद कॉलेज, अर्जुन नगर निपाणीचे प्राध्या.विकास माने,न्यू मॉडेल ज्युनियर कॉलेज कोल्हापूरचे आसिफ कोतवाल येथून हे तज्ज्ञ मार्गदर्शक मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती जावी, मुद्देसूद उत्तरे कशी लिहावीत? तसेच महत्त्वाचे प्रश्न कसे समजून लिहावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदकुमार साळवी, सचिव व कार्याध्यक्ष श्री. रोहित मयेकर, संचालक श्री सुरेंद्र माचिवले, प्रभारी प्राचार्या सौ. स्नेहा पालये , जाकादेवी हायस्कूलचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक नितीन मोरे , महाविद्यालयाचा स्टाफ तसेच ३२६ शिबीरार्थी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन एन.सी.सी. कॅडेट्सने केले होते.