(जाकादेवी / वार्ताहर)
मयुरेश विश्वास माने हे सध्या रत्नाकर शिक्षण संस्था दहिवली बु.|| संस्थेच्या रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु. या प्रशालेत २००९ पासून सहा.शिक्षक म्हणून काम करत आहेत. नुकताच त्यांना Microsoft कडून मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव एज्युकेटर एक्स्पर्ट २०२२ (MIE EXPERT ) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. आता मयुरेश माने यांना NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI या संस्थेकडून आंतरराज्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदरच्या पुरस्काराचे शनिवार दि.८ रोजी धर्मनाथ नगर, धर्मनाथ सर्कल, अशोक नगर गँगवाडी बेळगाव याठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. यानिमित्ताने कोकणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI ही संस्था कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गोवा राज्यातील उल्लेखनीय व्यक्तींच्या कामाची दखल घेवून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रातील कामासाठी गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. सन्मान चिन्ह, अभिनंदन पत्र, सन्मानपत्र, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच या संस्थेतर्फे आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर पुरस्कार, आंतरराज्य आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार, आंतरराज्य आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार, आंतरराज्य आदर्श वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कार, आंतरराज्य डेव्हलपर्स इंजिनियरिंग व बांधकाम गौरव पुरस्कार, आंतरराज्य आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, आंतरराज्य सहकाररत्न गौरव पुरस्कार, आंतरराज्य आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्कार आंतरराज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, आंतरराज्य आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार, आंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार या विविध क्षेत्रातील कामांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
उपक्रमशील शिक्षक मयुरेश माने यांची आंतरराज्य पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री.माने यांचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.