(पुणे)
पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आतापर्यत एकूण सात कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर आता कसब्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. कारण आता पुण्यातील ५० पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कसब्यात रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याची उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळं आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आता मनसेला पडलेल्या भगदाडामुळं त्याचा भाजपलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोटनिवडणुकीसाठीचं मतदान काही तासांवर येऊन ठेपलेलं असतानाच आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळं रविंद्र धंगेकरांना प्रचारात बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
कसब्यात महाविकास आघाडीचा प्रचार केल्याप्रकरणी मनसेनं रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम यांची हकालपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.