(रत्नागिरी/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे सुपुत्र मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली. मात्र नाराजी दुर करण्यासाठी दिलेलं हे पद म्हणजे बोळवण केल्यासारख आहे असे संगमेश्वर तालुक्यातील समर्थकांकडून बोलले जात आहे.
जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काही दिवसांपूर्वी जिल्हासंपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी जिल्हा कार्यकारिणीत बदल केले होते. संघटनेसाठी झोकून व निष्ठेने काम करणार्यांना कार्यकर्त्याना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्षपदी अविनाश सौंदळकर यांची नियुक्ती केल्याचा आरोप मनसेच्या जिल्हाभरातील अनेक पदाधिकार्यांनी केला. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचे समर्थक नाराज झाले होते. मनसेच्या स्थापनेपासून जितेंद्र चव्हाण यांनी आक्रमक स्टाईलने विविध आंदोलनातून समाजातील अनेक समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. धामणी यादववाडी ब्रिज, कडवई रेल्वे स्टेशन, कडवई बीएसएनएल टॉवर, कॉलेजची मान्यता अशी अनेक कामे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली होती. कोरोना काळात वीजबिल माफी मिळावी यासाठी त्यांनी आंदोलन छेडले होते. कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गलथान कारभाराविरोधात छेडलेल्या आंदोलनानंतर त्यांना व त्यांच्या सहकार्यांना तडीपारी सारख्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
जितेंद्र चव्हाण यांचे समर्थक नाराज असल्याच्या तक्रारी गुरूवारी रत्नागिरी दौर्यावर आलेले युवा नेते अमित ठाकरे यांच्यामार्फत पक्षनेतृत्वाकडे करण्यात आल्या. या नाराजीची दखल युवानेते अमित ठाकरे यांनी गांभिर्याने घेतली. त्यामुळे जितेंद्र चव्हाण यांना राज्यस्तरावर बढती मिळणार असल्याची चर्चा होती. अमित ठाकरेंचा रत्नागिरी दौरा होतो न तोच नुकतीच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर केली. यात अध्यक्ष पदी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली. तर जितेंद्र चव्हाण यांना सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले आहे. चव्हाण यांच्या निवडीचे जिल्हाभरातून मनसैनिकांनी स्वागत केले आहे.