(रत्नागिरी)
जिंदल कंपनीकडून मिरवणे परिसरात आणखी एक जेटी उभारण्याचे काम सुरू असल्याने, त्याचा त्रास भविष्यात मच्छीमारांना होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने जेटीचे काम थांबवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिंदल कंपनीने सीआरझेडचे उल्लंघन करीत समुद्र व खाडीदरम्यान तब्बल २५० एकर पर्यंत भराव टाकला आहे. याठिकाणी जेटीची उभारणी केली जात आहे. या पट्ट्यात मासेमारी करणाच्या मच्छीमारांवर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे खाडीमध्ये ये-जा करणेही कठीण होणार आहे. त्यामुळे जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, पडवे मच्छिमार सहकारी संस्था, आरमान मच्छीमार सहकारी संस्था पडवे गुहागर, आदर्श मच्छीमार सहकारी संस्था पडवे, हनुमान मच्छीमार सहकारी संस्था नवानगर काताळे, खोतबाबा मच्छीमार सहकार संस्था कुडली, सागारी आगर हेदवी गट मच्छीमारी सह. संस्था साखरी आगर, वेळणेश्वर मच्छीमार सहकारी संस्था वेळणेश्वर या संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना व पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
सीआरझेडचे उल्लंघन करीत आहेत. त्याचप्रमाणे जयगड येथून गॅस वाहतूक केली जात आहे. त्यामुळे भविष्यात गॅसची गळती होऊन अपघात होण्याचीही शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. याबाबत पालकमंत्री यांनी प्रशासनाला यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत मच्छीमार सोसायट्ट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात जेटीचे काम पुढील आदेश होईपर्यंत थांबवण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना काढले.