(मुंबई)
महाराष्ट्र सरकारमधील १०० कोटींचे कॅबिनेट मंत्रीपद प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. मंत्रिपदासाठी तब्बल १०० कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आले आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या सीडीआर तपासात ही माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीनं एकूण पाच आमदारांशी संपर्क साधला होता. मुख्य आरोपीच्या सीडीआरमधून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणात चौकशीतून असे समोर आलं होतं की, तुम्ही जर १०० कोटी रुपये दिले तर तुम्हाला महाराष्ट्रात स्थापन होणा-या नवनिर्वाचित सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल. याप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली होती.
अटक झाल्यानंतर या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा सीडीआर काढण्यात आला. यामध्ये राहुल कुल, समाधान अवताडे, सुभाष देशमुख, सुरेश दास आणि अतुल सावे या आमदारांशी मुख्य आरोपीनं संपर्क साधल्याचं समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रियाझने आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्यानंतर याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली गेली . यानंतर सर्व आमदारांना त्याच्या जाळ्यात सापडण्याचे नाटक करून ही माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणी आमदार राहुल कुल यांनी पोलिसांना कळवून मंत्रिपद मिळवण्याचा दावा करणा-यांना अटक करवून दिली होती.
कोल्हापूरचा रियाज या कटाचा मुख्य सूत्रधार
अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील रियाज हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील आहे. तोच या कटाचा मुख्य सूत्रधार होता. आता त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर गावी परतला. गावात आल्यानंतर त्याच्या स्वागताचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी रियाज शेखला जामीन मिळाल्याने फटाके उडवून फुले सुद्धा उधळण्यात आली.