जय जय रघुवीर समर्थ. संसाराच्या कष्टाचे निरसन होऊन आत्मज्ञान होण्यासाठी हा अध्यात्म ग्रंथ निर्माण केला आहे. सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे असे भगवदगीतेमध्ये दहाव्या अध्यायात सारंगधर बोलला आहे. ‘अध्यात्म विद्या विद्यानाम वाद: प्रवदतामहम’ यामुळे जो सर्वांगाने श्रोता आहे, तोच अध्यात्म विद्येचा परमार्थ असलेला अद्वैत ग्रंथ पाहण्यास समर्थ आहे. ज्याचं हृदय चंचल आहे त्याने हा ग्रंथ एकदा वाचून न सोडता वारंवार वाचला पाहिजे, ग्रंथवाचन सोडले तर त्याच्यातील लाभ होणार नाही. ज्याला परमार्थ जोडायचा आहे त्याने हा ग्रंथ पहावा, या ग्रंथाचा अर्थ शोधल्यास परमार्थ निश्चितपणे प्राप्त होईल.
नेत्र नसलेल्यास द्रव्यासाठा अंधास कळत नाही त्याप्रमाणे ज्याला परमार्थ करायचा नाही त्याला याचा अर्थ कळणार नाही. काही म्हणतात हे मराठीमध्ये काय सांगितले आहे हे चांगल्यासाठी ऐकू नये! असे म्हणणारे मूर्ख असून ते याच्यातील अर्थ जाणत नाहीत. लोखंडाचे पेटी केली त्यामध्ये नाना रत्न साठवली ती अभाग्याने लोखंड म्हणून फेकून दिली. त्याप्रमाणे भाषा प्राकृत असली तरी त्यामध्ये वेदांत आणि सिद्धांत आहे ते न जाणता त्याचा त्याग केला तर त्याला मंदबुद्धी म्हणावे लागेल. सहजगत्या धन सापडले असता त्याचा त्याग करणे मूर्खपणाचे आहे. त्याने द्रव्य घ्यावे, कशात साठवले आहे ते पाहू नये.
अंगणामध्ये परीस पडलेला आहे, मार्गामध्ये चिंतामणी आहे, आडामध्ये कल्पवल्ली उगवलेली आहे, त्याप्रमाणे प्राकृतामध्ये अद्वय, सुगम आणि अनुभवाधारित असे अध्यात्म ज्ञान सहजपणे देत आहे तरी अवश्य घ्यावे. त्याच्यासाठी तुम्हाला उत्पत्ती शोधायचे श्रम घ्यायला नको, सर्व शास्त्रार्थ चांगल्या सहवासामुळे, स्वनुभावामुळे समजत आहे. जे व्युत्पत्तीने कळत नाही ते सत्समागमामुळे कळते. तिथे व्युत्पत्ती शोधायचे श्रम घ्यायला नको. त्यामुळे जन्माचे सार्थक होण्याचे गुपित वेगळेच आहे.
भाषा बदलली म्हणून काही अर्थ वाया जात नाही आणि कार्यसिद्धी अर्थापाशी आहे. प्राकृतात व्यक्त झाल्याने संस्कृतची सार्थकता आहे. नाहीतर त्यातील गुप्त अर्थ कोण जाणू शकेल? म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता भाषेचा त्याग करून अर्थ स्वीकारा. उत्तम गोष्टी घ्या आणि साली टरफल फेकून द्या. अर्थ मुख्य आहे, भाषा वरील टरफल आहे. पण अभिमानाने अहंकाराने खटपट केली त्यामुळे मोक्षाची वाट अडवली आहे. यांनी या सांगण्यामधील लक्ष्यांश घ्यावा, वाक्यांशाचा विचार करू नये. त्यातून भगवंताचा महिमा कळला पाहिजे. मुक्या माणसाचे बोलणे हे ज्याचे तोच जाणतो त्याप्रमाणे स्वानुभवाच्या खुणा जाणण्यासाठी स्वानुभवीच पाहिजे. वाचेचाच हव्यास पुरेसा आहे तर अध्यात्माचा अर्थ जाणणारा श्रोता कसा मिळेल? जाणकारापुढे रत्न ठेवल्यावर त्याचे समाधान होते त्याप्रमाण ज्ञानी लोकांपुढेच ज्ञान बोलावेसे वाटते.
मायाजाळामुळे ज्यांचे चित्त विचलित झाले आहे, त्यांना हे निरूपण उपयोगी नाही. संसारी लोकांना याच्यातील अर्थ समजणार नाही. व्यवसायामध्ये मलीन झालेला आहे त्याला हे निरूपण कळणार नाही. त्याच्यासाठी अतिशय सावधपणा हवा. नाना रत्ने, नाना नाणी गाफिलपणे हाती घेतली तर हानी होईल. परीक्षा नसल्याने प्राणी फसेल. त्याप्रमाणे वरवर पाहून हे निरुपण समजणार नाही. मराठी भाषेत असले तरी समजणार नाही. हे निरुपणाचे बोल आणि अनुभवाची ओल आहे ते म्हणजे संस्कृतपेक्षा खोल अध्यात्मश्रवण आहे.
माया ब्रह्म ओळखावे त्याला अध्यात्म म्हणावे असे हे मायेचे स्वरूप आधी जाणून घ्या. माया सगुण साकार, माया म्हणजे सर्वस्व विकार, माया म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार. मायेचे दृश्य दृष्टीस दिसते, माया भास मनाला भासतो, विवेकाने पाहिल्यावर माया क्षणभंगुर, ती नाहीच हे समजते. विश्वाचे अनेकरूप म्हणजे माया. विष्णूचे स्वरूप म्हणजे माया. मायेची सीमा बोलावी तितकी अवर्णनीय आहे. माया बहुरूपी बहुरंगी आहे, ईश्वराच्या संगतीतही माया आहे, पहिली तर माया अभंग, अखिल वाटते. माया ही सृष्टीची रचना आहे, माया ही आपली कल्पना आहे, माया ज्ञानाशिवाय तुटता तुटत नाही. अशी माया वर्णन केली. थोडक्या उदाहरणाद्वारे सांगितली आहे. पुढे श्रोत्यांनी आपले लक्ष दिले पाहिजे. पुढे ब्रह्माचे निरूपण, ब्रह्माचे ज्ञान सांगत आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे मायेचे भान पूर्णपणे नष्ट होईल. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे मंगलाचरण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127