जय जय रघुवीर समर्थ. अनुभवांमध्ये अनुभव विलीन झाला. अनुभव नसताना अनुभव आला हेही एक स्वप्नच असून म्हणजे तू जागा झाला नाहीसच. स्वप्नामध्ये तू जागा झाला असून त्यामध्ये मी अजन्मा असे म्हणतो, जागा असूनही स्वप्नाची उर्मी गेलीच नाही. स्वप्नामध्ये जागेपण वाटते तशी अनुभवाची ओळख झाली, पण ते सत्याचे स्वप्न भ्रमरूप आहे. जागृती झाली आहे किंवा पलीकडे गेला हे विवेकाची धारणा मोडेल तेव्हाच घडेल. असे हे समाधान आहे ते बोलता येत नाही त्यामुळे ती निशब्दाची खुण आहे, इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अनिर्वाच्य नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
चतुर्दशी ब्रम्हा नाम दशक सप्तम, समास पहिला मंगलाचरण नाम समास
जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. विद्यावंतांचा पूर्वज, प्रसन्नमुख, एकदंत, त्रिनयन, चतुर्भुज, परशु धारण करणाऱ्या गजाननास नमस्कार. कुबेरापासून धन, वेदापासून परमार्थ आणि लक्ष्मीपासून समर्थ भाग्यास आले आहेत. त्याप्रमाणे मंगलमूर्ती आद्य गणेशापासून सर्व विद्या उत्पन्न झाल्या आहेत. या विद्येमुळे गद्य पद्य काव्य निर्माण करून कवी पूजनीय ठरले आहेत. समर्थांच्या लेकरांच्या अंगावर नाना अलंकार शोभतात त्याप्रमाणे मूळ पुरुषाच्या द्वारी कवि शोभतात. विद्या प्रकाशाचा पूर्णचंद्र असलेल्या गणेशाला नमस्कार असो. आपल्यामुळे बोध समुद्राला भरते येते. जो कर्तृत्वाचा आरंभ, मूळ पुरुष मुळारंभ, आदि अंती परात्पर स्वयंभू आहे. त्याच्यापासून इच्छा स्फूर्ती हीच शारदाकुमारी निर्माण झाली, आदित्यापासून ज्याप्रमाणे मृगजळाची गोदा निर्माण झाली. जिला खोटे म्हणताच ती गुंतवते.
मायेच्या लाघवीपणामुळे वक्त्याला वेगळेपणाचे वेड लावते. मायेमुळे द्वैत प्रपंच निर्माण होतो, तीच अद्वैताची खाण आहे, तीच अनंत ब्रह्मांडाचे आच्छादन आहे. किंवा ही विनासायास उगवणारी अनंत ब्रम्हांडास लगडलेली मूळ पुरुषाची दुहिता रूपी माउलीच आहे. आदिपुरुषांची सत्ता असलेल्या वेद मातेस मी वंदन करतो. मी सद्गुरु समर्थांची आठवण करतो. त्यांच्या कृपादृष्टिमुळे आनंदाची वृष्टी होते त्या सुखामुळे सर्व सृष्टी आनंदमय होते किंवा ते आनंदाचे जनक, सायुज्यमुक्तीचे नायक, अनाथ बंधूंना कैवल्या पद देणारे आहेत. मुमुक्षु चातकाचा सुस्वर ऐकून ज्या प्रमाणे अंबर करुणा करते त्याप्रमाणे सद्गुरु साधकांवर कृपेचा वर्षाव करतात. किंवा भवसागरमध्ये भरकटलेले तारू बोध करून पैलपार पोहोचणारे आणि जन्ममृत्युच्या भोवऱ्यात भाविकांना आधार असलेला, किंवा काळाचा नियंता, संकटांतून सोडविणारा, भाविकांची परम स्नेहाळू माता असलेला, परलोकींचा आधार, विश्रांतीचे ठिकाण असलेला, सुखाचे सुखस्वरूप माहेर असलेला असा सद्गुरू पूर्णपणे भेदाचा अडसर दूर करतो, त्या प्रभूला मी पणा विरहित लोटांगण. साधुसंत, आणि सज्जन श्रोत्यांना वंदन करून आता कथा पुढे नेत आहे ती सावधपणे ऐका.
संसार हे दीर्घ स्वप्न आहे. लोभाने लोक, माझी बायको, माझा पैसा, माझी कन्या, माझे पुत्र असे बरळतात. ज्ञानाचा सूर्य मावळला, त्यामुळे प्रकाश लोपला,पूर्ण ब्रह्मगोळा अंधकारमय झाला. सत्वाचे चांदणे दिसत नाही, काही मार्ग दिसत नाही आणि भ्रांतीच्यामुळे सगळे दिसेनासे झाले. देहबुद्धीच्या अहंकारामुळे घोरत पडलो आहोत. विषयसुखामुळे थोर थोर व्यक्ती दुःखाने आक्रंदन करीत आहेत. काही अज्ञानरूपी निद्रेतअसतानाच मेले, काही पुन्हा पुन्हा झोपले असे अनेक लोक आले आणि गेले, या निद्रेमुळे खूप येरझारा झाल्या. परमेश्वराची माहिती नसल्याने कष्ट भोगले. अशी कथा समर्थ सांगताहेत पुढील कथा ऐकुया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127