उदंड व धन आहे पण ते गुप्त आहे. सेवकांना ते कसे माहिती असेल? त्यांना फक्त बाह्य आकाराच ज्ञान आहे. अर्थ उदंड आहे, मात्र ते गुप्त आहेत, बाहेर प्रकट पदार्थ दिसतात मात्र खरा स्वार्थ आतमध्ये आहे. त्याप्रमाणे दिसणारे हे मायीक आहे हे सगळे लोक वरवर पाहत असतात पण ज्यांना विवेक आहे ते आतील दृश्य जाणतात. गुप्त गोष्ट जाणतात. पैसे देऊन पाणी सोडले लोक म्हणतात सरोवर भरले, त्याचे अंतरंग समर्थ जनांना माहिती असते. तसे समर्थ हे ज्ञाते असतात, तेच परमार्थ ओळखतात, इतर दृश्य पदार्थात स्वार्थ मानतात.
गडी ओझे वाहतो, मात्र त्यामध्ये असलेली श्रेष्ठ रत्न कर्मयोगी व्यक्तीला मिळतात. काहीजण लाकडामध्ये स्वार्थ साधतात काही जण गोवऱ्या वेचतात पण राजे लोक तसे नसतात ते पालखीत बसतात. ज्यांच्याकडे विचार आहे ते सुखासन ग्रहण करतात इतर लोक भार वाहतच मेले. काहीजण उत्कृष्ट अन्न भक्षण करतात काहीजण विष्ठा सावडतात आणि त्याचाही अभिमान ते बाळगतात! श्रेष्ठ लोक उत्तम गोष्टीचा उपभोग घेतात, निरुद्योगी लोक फालतू गोष्टीला महत्त्व देतात. सार आणि असार यातील फरक सज्ञान लोक जाणतात. चिंतामणी, परिस गुप्त असतात, काचेचे मणी मात्र जागोजाग दिसतात. सोन्याच्या रत्नाचा खाणी गुप्त असतात, दगड माती मात्र भरपूर पडलेली दिसते. उजवा शंख, उजव्या वळणाची वेल, अनमोल गुप्त वनस्पती या दुर्मिळ असतात. एरंड आणि धोत्रे मात्र जागोजागी उगवलेली दिसतात. कल्पतरू कुठे दिसत नाही, शेराचे झाड मात्र भरपूर दिसते. चंदन सापडणे मुश्कील असते, बोरी बाभळी मात्र उदंड दिसतात.
कामधेनु इंद्राकडे सापडते बाकी सृष्टीमध्ये जनावर भरपूर असतात. राजे लोक भाग्य भोगतात इतरांना कर्मानुसार भोगावे लागते. लोक नानातर्हेचे व्यापार करतात सगळे स्वतःला श्रीमंत म्हणवून घेतात, मात्र कुबेराचं महत्त्व कोणालाच येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी योगेश्वर हाच गुप्त लाभाचा ईश्वर असतो. इतर लोक पोटासाठी नाना मते शोधतात. सार काही दिसत नाही, लोकांना असार सापडत राहतं, सारासार विचार फक्त साधू लोक जाणतात. इतरांना काय सांगायचे? खरे काय आणि खोटे काय? साधुसंतांची ओळख साधुसंतच जाणतात. गुप्तधन मिळण्यासाठी डोळ्यांना अंजन लावावे लागते, त्याप्रमाणे गुप्त असलेला परमात्मा जाणून घेण्यासाठी सज्जनांची संगत शोधावी लागते.
राजाचे सानिध्ध्य असेल तर सहजपणे श्रीमंती प्राप्त होते, त्याप्रमाणे सत्संग धरला तर सद्वस्तु लाभते. अस्ताव्यस्त व्यक्तीला अस्ताव्यस्त व्यक्ती भेटतात, प्रशस्ताला प्रशस्त विचार लाभतो. म्हणून दिसणारे हे सगळे अशाश्वत आहे, परमात्मा अच्युत अनंत या दृश्यपेक्षा वेगळा आहे. दृष्यावेगळा दृष्याच्या आतमध्ये सर्व चराचरामध्ये तो सर्वात्मा निश्चितपणे आहे. संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता लोकामध्ये सार्थक करायचे असेल तर ते विचारपूर्वकच होऊ शकेल. हे अनुभवाचे बोल आहेत. विचार करून त्याची प्रचिती घेणे. प्रचिती पाहणारे शहाणे, बाकीचे नाहीत. अशाप्रकारे सार कसे शोधावे त्याची माहिती समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत पुढील माहिती ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127