जय जय रघुवीर समर्थ. परमार्थाचे साधन कोणते असते ते ऐका त्यामुळे निश्चितपणे आपले समाधान होईल. श्रवणामुळे भक्ती प्राप्त होते, श्रवणामुळे विरक्ती उद्भवते, श्रवणामुळे विषयांची आसक्ती दूर होते. श्रवणामुळे चित्तशुद्धी होते, श्रवणामुळे बुद्धी दृढ होते, श्रवनामुळे अभिमानाची उपाधी नाहीशी होते. श्रवणामुळे निश्चय घडतो, श्रवणामुळे ममता नाहीशी होते, श्रवणामुळे अंतरामध्ये समाधान मिळते. श्रवणामुळे शंका दूर होतात, श्रवणामुळे संशय तुटतो, त्यामुळे आपले पूर्वग्रह नाहीसे होतात. आपले मन आवरले जाते, समाधान मिळते. बंधन तुटते, श्रवणामुळे मीपण जाते, देह्बुधीचे बंधन नाहीसे होते. त्यामुळे धोका नाहीसा होतो. विविध अपाय भस्म होतात.
श्रवणामुळे कार्यसिद्धी होते, श्रवणामुळे समाधी लागते, समाधान मिळवून देणारी सिद्धी मिळते. सत्संग आणि श्रवण केले की निरुपण समजते. श्रवणामुळे आपण परमेश्वराशी एकरूप होतो. श्रवणामुळे प्रबोधन वाढते, प्रज्ञा प्रगत होते, विषयाकडे आपली ओढ नाहीशी होते. श्रवणामुळे विचार कळतात, श्रवणामुळे ज्ञान प्रबळ होते, श्रवणामुळे साधक परमात्मप्राप्तीच्या जवळ जातो. श्रवणामुळे सद्बुद्धी, विवेक जागृत होतो, श्रवनामुळे मन भगवंताच्या मागे लागते. त्यामुळे वाईट संगती तुटते, काम कमी होतो, धोका एकदम कमी होतो. मोह नाहीसा होतो, स्फूर्ती श्रवणामुळे प्रकाशते. सदवस्तू निश्चितपणे दिसते. श्रवणामुळे उत्तम गती मिळते, श्रवणामुळे शांती मिळते. त्यामुळे निवृत्ती, अचलपद मिळते. श्रवणा सारखा सारांश नाही, श्रवणामुळे सर्व काही घडते. भवनदी तरून जाण्यासाठी श्रवण हाच एक पर्याय आहे. श्रवण हा भजनाचा आरंभ आहे, श्रवण हा सर्व गोष्टींचा आरंभ आहे. श्रवणामुळे सर्वकाही आपोआप होते.
प्रवृत्ती अथवा निवृत्ती यांची प्राप्ती श्रवणाशिवाय होत नाही, हे सगळ्यांना प्रत्यक्ष माहिती आहे. ऐकल्याशिवाय कळत नाही हे लोकांना माहिती आहे, त्यामुळे कोणताही प्रयत्न करण्याच्या आधी श्रवण करावे लागते. जन्मांमध्ये कधी ऐकलंच नसेल तर संदेह निर्माण होईल म्हणून श्रवणासारखे दुसरे काहीही नाही. श्रवण नसेल तर कार्य होऊ शकत नाही. सूर्य नसेल तर सर्व अंधकार पडतो तसं श्रवण नसेल तर होते. नवविधाभक्ति असो, चतुर्विध मुक्ती असो, सहज स्थिती असो श्रवण नसले तर कळत नाही. स्नान, संध्या,जप, होम, पठण, पाठण,देवतार्चन व वैश्वदेव ही षटकर्मे करणे श्रवणावाचून होत नाहीत. पुरश्चरण, विधियुक्त उपासना श्रवशिवाय कळत नाही. नाना व्रते, नाना दाने, नाना तपे, नाना साधने, नाना योग, तीर्थाटणे श्रवणाशिवाय कळत नाहीत. नाना विद्या, पिंडज्ञान, नाना तत्त्वांचे शोधन, नाना कला ब्रह्मज्ञान, श्रवणाशिवाय कळत नाही. अ
ठरा भार वनस्पती केवळ पाण्यामुळे वाढतात त्याप्रमाणे या एका रसामुळे सगळ्या जीवांची उत्पत्ती होते. सर्व जीवांसाठी पृथ्वी एक आहे, सगळ्या जीवांसाठी सूर्य एक आहे, सगळ्या जीवांसाठी वायू एक आहे. सगळ्या जीवासाठी आकाश एक आहे, सगळ्या जीवांचा वास एका परब्रम्हामध्ये आहे. त्याप्रमाणे सगळ्या जिवांना मिळून एकच साधन आहे ते म्हणजे श्रवण सगळ्या प्राणिमात्रांना हे साधन उपयुक्त आहे, असे समर्थ सांगतात. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127