दशक चौथा समास चौथा गुरु पादसेवन भक्ती
ज्ञानमार्ग समजण्यासाठी सत्संग धरावा. सत्संगाविना प्रसंग बोलूच नये. सद्गुरूचे चरण धरावे त्याचे नाव पादसेवन असे आहे. हे चौथ्या भक्तीचे लक्षण मी वर्णन केले आहे. देवब्राम्हण आणि महानुभाव म्हणजे अनुभवी संत यांचे भजन करावे. त्यांच्या ठाई सद्भाव धरावा असे रूढीचे बोलले जाते. सद्गुरूंच्या पायाची सेवा करणे याचे नाव पादसेवन. पादसेवन ही चौथी भक्ती आहे त्यामुळे तिन्ही जगतामध्ये पावन होतो. त्यामुळेच साधकास सायुज्य मुक्ती मिळते. थोरापेक्षा थोर असलेल्या चौथ्या भक्तीचा निर्धार केला पाहिजे त्यामुळे अनेक प्राणी पैलपार होतात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त श्रीराम
दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती
मागे भक्तीचे निरूपण केले आता सावधानपणे पाचवी भक्ती ऐका. पाचवी भक्ती म्हणजे अर्चना. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्र शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने, नाना उपकरणे, नाना अलंकार भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्यान याला पाचवी भक्ती म्हणतात. देव, ब्राह्मण,अग्नीपूजन, साधु-संत अतीथी पूजन, यती पुजन, गायत्री पूजन याला पाच व्यक्ती म्हणतात धातु पाशान बत्ती का पूजन चित्र मात्र पूजन, घरातील देवतांचे पूजन याचे नाव पाचवी भक्ती. शालिग्राम, चक्रांकित, लींगे, सूर्यकांत, सोमकांत, बाण, तांदळे, नर्बदे, भैरव, भगवती, मल्हारी, नरसिंह, बनशंकरी, नाग आणि नाना परी पंचायतन पूजा त्यामध्ये गणेश, सूर्य, शक्ति, शिव, आणि विष्णू या देवता येतात. गणेश, शारदा, विठ्ठल मूर्ती,रंगनाथ, जगन्नाथ, तांडव मूर्ती, श्रीरंग, हनुमंत, गरुड मूर्ती यांची पूजा करावी. मत्स्य, कुर्म, वराह मूर्ती, नरसिंह, वामन, भार्गव मूर्ती, राम कृष्ण हायग्रीव मूर्ती यांचे पूजन करावे. केशव, नारायण, माधव मूर्ती, गोविंद, विष्णु, मधुसूदन मूर्ती, त्रिविक्रम, वामन, श्रीधर मूर्ती, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम मूर्ती, अधोक्षज, नारसिंह, अच्युत मूर्ती, जनार्धन आणि उपेंद्र, हरिहरांच्या अनंतमूर्ती, भगवंत, जगदात्मा, जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या विविध मूर्ती यांची पूजा करावी. अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, श्रीमन्नारायण, श्री हरिनारायण, आदिनारायण, शेषशायी परमात्मा अशा परमेश्वराच्या मूर्ती उदंड आहेत. त्यांचे अर्चन करावे. ही पाचवी भक्ती आहे.
याबरोबरच कुळधर्म सोडू नये. उत्तम किंवा मध्यमप्रकारे करीत जावे. जाखमाता, मायराणी, बाळा, बकुळा, मानवीणी, मांगिणी, जोगिनी यांचे कुळधर्म करावे. नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. नाना उपचाराने पूजा करावी. परमेश्वराची पंचामृत, गंधाक्षता, पुष्प, सुगंधी द्रव्ये, धूपदीप, कापराची निरांजने, नाना खाद्य नैवद्य, सुंदर नाना फळे, तांबूल प्रकार, दक्षिणा, नाना अलंकार, दिव्य वस्त्रे, वनमाळा, पालखी, सुखासन, छत्री, मेघडंबरी, अबदागिरी, नाना वाद्ये, दिंड्या पताका, निशाणे, टाळ मृदुंग, नाना वाद्य, नाना उत्सव, नाना भक्त समुदाय, हरिदास आणि भगवंताचे सद्भावाने गायन करतात. कूप, सरोवरे, नाना देवालये, शिखरे, मनोहर वृंदावन, भुयारे, यात्रेच्या वेळेस येणारे बाजार मंड्या, धर्मशाळा देवाच्या द्वारी पडशाळा, नाना उपकरणे, नक्षत्रमाळा, नाना वस्त्र सामग्री, नाना पडदे, मंडप, नाना रत्नघोस याद्वारे पूजन करावे. नाना देवळासमोर भक्तीपूर्वक हत्ती घोडे रथ वगैरे अर्पण करावे. असेही अर्चना भक्तीचे वर्णन श्री समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. पुढील वर्णन आपण पुढच्या भागात ऐकू या.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127