जय जय रघुवीर समर्थ. अरे जे झालेच नाही त्याची माहिती तू विचारतो तरीसुद्धा तुला काही संशय राहू नये म्हणून मी सांगतो. दोरी आहे म्हणून तर साप वाटतो, पाणी आहे म्हणून तरंग निर्माण होतात, सूर्य आहे म्हणून मृगजळ दिसतं, कल्पना आहे म्हणून स्वप्न दिसतं. शिंपले आहे, पण रूपे वाटतं, पाणी आहे म्हणून क्षणभर गार वाटते.
मातीमुळे भिंत निर्माण झाली, समुद्रामुळे लहर आली, डोळ्यांमध्ये भिंग दिसते, सोन्यामुळे अलंकार झाले. तंतू मिळून वस्त्र तयार झाले, कासवासाठी हातापायांचा विस्तार झाला. तूप होते ते घट्ट झाले. खाडी आहे म्हणून मीठ झाले, मूळ प्रतिमा आहे म्हणून प्रतिबिंब दिसते, पृथ्वी आहे म्हणून झाड आले, झाड आहे म्हणून सावली आली. मोठेपणा आहे म्हणून उच्च नीच आले. असे अनेक दृष्टांत आहेत. मात्र द्वैत असताना अद्वैत कसे म्हणता येईल? तसे बोलताच येत नाही. भासामुळे भास भासतो, दृष्याकरिता अदृश्य दिसते. अदृश्याला उपमा नाही, म्हणून निरूपम आहे. कल्पनाविरहित हेतू, दृश्य नसताना दृष्टांत, द्वैतापासून वेगळे द्वैत कसं झालं? भगवंताची विचित्र करणी, सहस्रफणी वर्णन करता येत नाही. त्याने सहजपणे अनंत ब्रम्हांडाची उभारणी केली.
परमात्मा परमेश्वर सर्व कर्ता जो ईश्वर त्याच्यापासून सर्व विस्तार झाला. अशी अनंत नावे धरणारा, अनंत शक्ती निर्माण करणारा तोच चतुर मूळपुरुष जाणावा. त्या मूळपुरुषाची ओळख म्हणजे मूळ मायाच. सर्व काही कर्तेपण तिथेच आले. खरे पाहता हे सर्वच मिथ्या असताना पहिल्या ओवीत सांगितलेला अजातवादाचा सिद्धांतच सत्य होय. परंतु हे उघड बोलू नये. हा अनुभव आहे. सर्व उपाय साधने द्वैतमयच असल्याने अशा बोलण्याने त्यांचे खंडन केल्यासारखे होऊन लोकनिष्ठेला तडा जातो. ईश्वरापासून हा सगळा विस्तार झाला, हे सर्वांनी मानले तरी त्या देवाला ओळखले पाहिजे. सिध्दांचे निरुपण अंतःकरण परिपक्व नसल्याने साधकाला समजू शकत नाही.
अविद्येमुळे जीव आहे, मायेमुळे शिव आहे आणि मूळ मायेमुळे देव आहे, म्हणून सर्वांचे कारण मूळ माया आहे. तो अर्थ जाणण्यासाठी अनुभवी पाहिजे. मूळ माया म्हणजेच मूळ पुरुष. तो सगळ्यांचा ईश्वर. त्यालाच अनंतनामी जगदीश असे म्हणतात. सगळी माया विस्तारली आहे, परंतु ती पूर्णपणे मिथ्या आहे. या वचनाची खोली एखादाच जाणतो. असे अनिर्वाच्य बोलले तरी स्वानुभवाने ते जाणायला हवे. संतसंगाशिवाय ते उमजत नाही. माया तोच मूळपुरुष, हे साधक मान्य करीत नाहीत. मग अनंत नाम जगदीश कोणाला म्हणायचे? नामरूप मागे लागले, तर बोलणे नीट झाले, येथे श्रोत्यांनी कोणते अनुमान केले? अशा तऱ्हेचे बोलणे झाले तरी मागील शंका तशीच राहिली. निराकार असताना मूळमाया कशी झाली?
इंद्रजाल जादु ही खोटी असते, पण तो हा खेळ कसा झाला? ते सगळे विस्तार करून सांगू. आकाश स्थिर असते त्याच्यामध्ये चंचल वायू राहतो तशी मूळमाया जाणावी. वायूच्या रूपामुळे आकाश भंगले हे सत्य मानता येत नाही. तशी मूळमाया तशीच राहिली. आणि तिथे निर्गुणता साठली. या दृष्टांतामुळे मागील शंका दूर झाली. वायु पुरातन नव्हता तशीच मूळ माया आहे. खरी म्हंटले तरी ती पुन्हा लय पावत असते, अशी माहिती समर्थ देत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127