(नवी दिल्ली)
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर (IND W vs BAN W) मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. या सामन्यात हरमनप्रीतला गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत – बांगलादेश दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना (IND W vs BAN W) मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरला. भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयश आले. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हमरनप्रीत कौर संतप्त झाली. आता तिला हा संतप्तपणा नडला आहे.
या सामन्यात (IND W vs BAN W) भारताची कर्णधार हमरनप्रीत कौर नाराज दिसली. अंपायरने आऊट दिल्यानंतर हरमनप्रीतने बॅटने स्टंपला आदळले. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर तिने प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये एक विधानही केले की, पुढच्या वेळी बांगलादेशला येण्यापूर्वी संघाला अशा अंपायरिंगला सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवू. तिच्या या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
मैदानावरील घटनेसाठी (स्टंपवर बॅट मारणे) तिला तिच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात येणार आहे. तर सादरीकरण समारंभात तिने स्वतःचे प्रतिनिधित्व केल्यामुळे तिला तिच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात येणार आहे. एवढेच नाहीतर तिला मैदानावरील घटनेसाठी दोन डिमेरिट पॉइंट आणि सादरीकरण समारंभात पंचांविरुद्ध केलेल्या आरोपासाठी एक डिमेरिट पॉइंट मिळणार आहे. यामुळे हमरनप्रीत कौरला तिचा संतप्तपणा चांगलाच नडल्याचे दिसत आहे. सामना संपल्यानंतरही हरमनप्रीत कौरचा राग शांत झाला नाही आणि प्रझेंटेशनदम्यान तिने बांगलादेश क्रिकेटवर टीका केली. याचा फटका हरमनप्रीत कौरला बसला. मॅच फी व्यतिरिक्त तिला ३ डिमेरिट पॉइंट देण्यात आले आहेत.
डिमेरिट पॉइंट्स हे मैदानावर अयोग्य वर्तनासाठी शिक्षा म्हणून दिले जातात. या अंतर्गत जर एखाद्या खेळाडूला २४ महिन्यांत ४ डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याच्यावर एक कसोटी आणि दोन मर्यादित षटकांच्या सामने खेळण्यावर बंदी घातली जाऊ शकते.