(अहमदाबाद)
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषकाच्या गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. परंतु हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या काळात गुजरातमध्ये रात्रभर गरब्याची धामधूम असते. त्यामुळे सुरक्षेची समस्या उद्भवू शकते.
या कारणास्तव सुरक्षा एजन्सींनी बीसीसीआयला सामना इतर दिवशी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हा सामना नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व यजमान स्थळांच्या सदस्यांना आज २७ जुलै (गुरुवार) रोजी नवी दिल्ली येथे बैठकीसाठी बोलावले आहे. जेथे भारत-पाकिस्तान सामन्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
अहमदाबादमध्येच होणार चार मोठ्या लढती
एक लाख प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-पाक सामना रंगणार आहे. या मैदानावर स्पर्धेतील चार मोठ्या लढती होणार आहेत. ज्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध पाकिस्तान आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. १० शहरात होणाऱ्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलच्या लढती मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.