(रत्नागिरी)
पर्यावरणपूरक गणपती व देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुवारबावच्या उत्कर्षनगरमधील संजय जगन्नाथ वर्तक यांनी सलग १५ व्या वर्षी भारतीय सेनेला मानवंदना देणारा पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. या वर्षी वर्तक कुटुंबीयांनी १२ फुटी देखाव्यामध्ये बाप्पा साकारला आहे. रात्रंदिवस आपल्या प्राणांची तमा न बाळगणाऱ्या सैनिकांना मानवंदना म्हणून सैनिकांच्या वेशातील बाप्पा साकारला आहे.
आपल्या भारताच्या संरक्षण दलामधील वायुदल नौदल व भारतीय सेना हे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. आपल्या कुटुंबाचा त्याग करून देशवासीयांना सुखाची झोप मिळावी यासाठी सीमेवर तैनात असणारी हीच ती देव माणसे. ही सर्व देव माणसे आम्हा भारतवासियांसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा या भारतीय सेनेला अभिवादन करण्याकरिता वर्तक कुटुंबीयांनी देखावा साकारला आहे.
या देखाव्यासाठी पर्यावरणपूरक वस्तू वापरल्या आहेत. यामध्ये पुठ्ठा, कागद, दोरा, पिठाची चिक्की, कापड, टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. रणगाडा साकारला आहे. बुलेट गाडीवर बाप्पा सवार झाले आहेत. बाप्पांचा वेश भारतीय सैनिकांचा आहे. एका भिंतीवर विमान सज्ज आहे. बाप्पाच्या मागे भारताचा नकाशा साकारला असून बाप्पा एका युद्धनौकेवर बसवला आहे.