(राजापूर / प्रतिनिधी)
भारतीय महिला अन्याय व अत्याचार विरोधी मोर्चा कोकण विभागीय अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समिती माजी सभापती सौ. धनश्री मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
देश पातळीवर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय महिला अन्याय व अत्याचार विरोधी मोर्चा या नोंदणीकृत संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक हिंदरत्न दीपक लोंढे यांनी सौ. धनश्री मोरे यांची कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे. कोकण विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राजापूर तालुक्यातील पाचल येथील रहिवाशी असलेल्या सौ. धनश्री दत्तात्रय मोरे यांनी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा पुरवठा दक्षता समिती आदी सदस्य म्हणून काम केले आहे. तर कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या राजापूर अर्बन बँक संचालक म्हणून 18 वर्ष काम करून चेअरमन म्हणूनही काम केले आहे. महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सौ. धनश्री मोरे यांची भारतीय महिला अन्याय व अत्याचार विरोधी मोर्चा संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.