(दिल्ली)
भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी सुमारे ५ सेमी सरकत असून त्यामुळे हिमालयावरील ताण वाढत असून आगामी काळात मोठ्या भूकंपाच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे, असा इशारा हवामानशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे. हैदराबादस्थित नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनजीआरआय) चे मुख्य वैज्ञानिक आणि भूकंपशास्त्रज्ञ डॉ एन पूर्णचंद्र राव यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.
एनजीआरआयचे मुख्य शास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ डॉ एन पूर्णचंद्र राव म्हणाले, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्लेट्सचा समावेश आहे ज्या सतत गतीमध्ये असतात. भारतीय प्लेट दरवर्षी ५ सेमी हालचाल करत आहे. परिणामी हिमालयाच्या बाजूने ताण वाढत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात भूकंप होण्याची शक्यता वाढली आहे. उत्तराखंडमध्ये १८ सिस्मोग्राफ स्टेशनचे मजबूत नेटवर्क आहे. या प्रदेशाला हिमाचल आणि नेपाळच्या पश्चिम भागामध्ये भूकंपीय अंतर म्हणून संबोधले जाते, ज्यामध्ये उत्तराखंडचा समावेश होतो, असे ते म्हणाले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, सोमवारी (२० रोजी) रात्री १०.३८ वाजता ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून ५६ किमी उत्तरेस झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खोल होता. तर आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा शहरालाही १९ फेब्रुवारी रोजी भूकंपाचा धक्का बसला. मात्र या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.