(रत्नागिरी)
भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने कारसेवकांचा रामाची प्रतिमा भेट देऊन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यामध्ये कारसेवक निलाताई दाते, रत्नाकर हेगिष्टे, शामकिशोर पांचाळ, श्रीनिवास पटवर्धन, शिल्पाताई पटवर्धन, विद्या विजय वाढये, यशवंत आत्माराम धुपकर, संजय केशव पटवर्धन आदींचा समावेश होता. यावेळी कार सेवकांनी आपल्या भावना उत्स्फूर्तपणे मांडल्या आपल्या भावना व्यक्त करताना कारसेवक भावुक झालेले पाहायला मिळाले.
मागील अनेक शतकांची प्रतीक्षा पूर्ण झाली आणि हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे शक्य झाले मोदी यांची इच्छाशक्ती यामुळेच रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा नव्याने होऊ शकली. आपल्या भावना व्यक्त करताना कारसेवक म्हणाले की, आम्ही 1990 आणि 1992 साली आम्ही आयोध्येला गेलो होतो. आमची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती. जागा मिळेल तिथे आम्ही राहत होतो. बाबरी मशिद पाडण्यासाठी आम्ही सर्व मनापासून यामध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळीचा क्षण आमच्यासाठी एक परीक्षेसारखा होता आज इतक्या वर्षानंतर रामाची प्रतिष्ठापना होऊन भव्य दिव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे आम्हाला याचा अतिशय आनंद आहे आम्ही दिवसभर हा सोहळा टीव्हीवर पाहत होतो आणि आम्हाला भरून पावल्यासारखे झाले.
आम्ही बाबरी मशीद पाडण्यासाठी गेलो तेव्हा आम्ही ट्रेनने त्या ठिकाणी गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला पकडण्यात आले. आमच्यावर लाठीचार्ज झाला, जिथे वाट मिळेल तिथे आम्ही पळत होतो. तेथे अनेक चांगली माणसे आम्हाला मिळाली ती आम्हाला मदत करीत होती. आम्ही देखील तुमच्याबरोबर आहोत ही भावना तेथील प्रत्येक व्यक्ती आम्हाला व्यक्त होत होती. आम्ही प्रत्यक्ष कार सेवेसाठी गेलो होतो, मात्र यावेळी येथे आमचे शेजारी आमच्या कुटुंबीयांना देखील सांभाळत होते. त्यामुळे आमच्या कारसेवेबरोबर त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
आता ज्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे त्या ठिकाणी असणारी बाबरी मशीद आम्ही कारसेवेतून पाडली होती व त्या ठिकाणी गाभारा तयार करून राम लल्लांची मूर्ती ठेवण्यात आली. आज इतक्या वर्षांनी आम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले याचा अत्यंत आनंद आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह शहर अध्यक्ष राजन पटवर्धन, दादा ढेकणे, संदीप सुर्वे, संकेत कदम, लीलाधर भडकमकर, मंदार मयेकर, योगेश हळदवणेकर, शैलेश बेर्डे, सौ. वर्षा ढेकणे आदी उपस्थित होते.