(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी ओरी विभागातील युवा नेते प्रतिक सुधीर देसाई यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उत्तर विभागाच्या युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा नेते प्रतिक देसाई हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत लोकोपयोगी कामे केली आहेत. सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिक देसाई यांनी झोकून देऊन काम केले आहे.
कोरोना कालावधीत त्यांनी अनेक गरजवंतांना सढळहस्ते मदतीचा हात दिला आहे. सामाजिक व विधायक कामाची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रतिक देसाई यांची रत्नागिरी तालुक्याच्या उत्तर विभागाच्या युवा अध्यक्षपदी निवड केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रतीक देसाई यांना रत्नागिरी तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करुन तसे अधिकृत पत्र बहाल केले आहे. प्रतीक देसाई यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेत भाजपातर्फे रत्नागिरी तालुका युवा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल रत्नागिरी तालुक्यातून भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला आहे येत्या निवडणुकीमध्ये मोर्चा बांधण्यासाठी युवा अध्यक्ष प्रतिक देसाई आणि त्यांची टीम सक्रियपणे काम करून पक्षाला पाठबळ देतील,असा विश्वास वरिष्ठ कार्यकर्ते व नेते मंडळींनी व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित युवा अध्यक्ष प्रतिक देसाई तसेच सरचिटणीस उमेश देसाई, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांचे भाजपाच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाने दिलेली जबाबदारी पक्षीय संघटनेच्या बळावर यशस्वीरित्या पार पाडू, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतिक देसाई यांनी व्यक्त केला.