(क्रीडा)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला गेला. या सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्याच दिवशी सामन्याचा निकाल लागला. नागपूरमधील पहिल्या कसोटीत भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. अश्विनच्या फिरकीची जादू चालली आणि ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात १०० धावाही करू शकला नाही. ९१ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. अश्विनने सामन्यात चमकदार कामगिरी केली. तर ऑस्ट्रेलियाच्या मर्फीनेही ७ गडी बाद करत उत्कृष्ट गोलंदाजी केली.
भारताने नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला आहे. मोहम्मद शमीने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ९१ धावांत गुंडाळले. त्याने बोलंडला पायचीत केले.
दुसऱ्या टोकाला स्टीव्ह स्मिथ २५ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यातील विजयासह भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे या सामन्याचे हिरो ठरले. जडेजाने सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आणि ७० धावा केल्या. त्याचवेळी अश्विनने २३ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियासाठी संपूर्ण सामन्यात एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. तथापि, गोलंदाजांमध्ये टॉड मर्फीने पदार्पणाच्याच सामन्यात ७ विकेट घेत करिअरची शानदार सुरुवात केली.
पहिल्या डावात भारताला २२३ धावांची आघाडी मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता आणि कांगारू संघानेही लढण्याचा उत्साह दाखवला नाही. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला आणि संपूर्ण संघ एका सत्रातच ३२.३ षटकांत अवघ्या ९१ धावांवर गारद झाला. एका टोकाला स्टीव्ह स्मिथ २५ धावांवर नाबाद राहिला, पण त्याला साथ मिळाली नाही. लॅबुशेनने १७ धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने सर्वाधिक ५, जडेजा आणि शमीने प्रत्येकी २ बळी घेतले.