(मुंबई)
भारतीय कबड्डी संघाने पुन्हा एकदा एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. एशियन कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ च्या फायनलमध्ये भारताने इराणचा पराभव केला असून आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार पवन शेरावतने सुपर १० पॉईंट्स मिळवून भारताकडे विजय खेचून आणला. एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे आतापर्यंत ९ एडिशन झाले असून त्यात ८ वेळा भारताने विजेतेपद पटकावले आहे.
दक्षिण कोरियातील बुसान शहरात ही स्पर्धा आयोजित केली होती. भारत विरुद्ध इराण यांच्यात रंगलेल्या कबड्डीच्या सामन्यात भारतीय संघाचे सुरुवातीपासूनच वर्चस्व होते. त्यानंतर सामन्याच्या १० व्या मिनिटाला इराणचा संपूर्ण संघ बाद झाला. पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी यशस्वी रेड करत काही टॅकल पॉईंट्स मिळवले. फायनल सामन्यात चांगली सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा लीड घेतली आणि १९ व्या मिनिटाला भारताच्या टीमने पुन्हा एकदा इराणच्या पूर्ण संघाला ऑलआउट केले.
पहिल्या हाफपर्यंत भारतीय संघ २३ – ११ असा आघाडीवर होता. परंतु त्यानंतर इराणचा कर्णधार मोहम्मदरझा शादलोई चियानेह याने दोन रेड पॉईंट्स आणि सुपर रेडच्या जोरावर भारतीय संघाला ऑल आउट केले आणि सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना इराणने भारतासह आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर भारताने ४२-३२ असा सामना जिंकत विजेतेपदावर नाव कोरले.