( नवी दिल्ली )
कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताला पहिलं पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. संकेतने ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्रॅम वजन उचलून पदकावर आपलं नाव कोरलं आहे. संकेत सरगर हा मूळचा सांगलीचा असून त्याचे वडील पानाची टपरी चालवतात. त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नांच्या जोरावर संकेतने एक मोठं यश मिळवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४८ किलो वजनी गटात सहभागी संकेतने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नातच १३५ किलो वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये ११३ किलो वजन संकेतने उचललं. त्यामुळे त्याने एकूण (११३+१३५) २४८ किलो वजन उचलत सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला.
दुसऱ्या प्रयत्नात संकेतने १३९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते जमलं नाही. तेव्हाच त्याच्या हातालाही दुखापत झाली. तिसऱ्या प्रयत्नात १३९ किलो वजन उचलण्याचा त्याने प्रयत्न केला पण दुखापतीमुळे तो अयशस्वी ठरला. ज्यामुळे अखेर त्याचा स्कोर २४८ किलो इतकाच राहिला.
मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद आणिक याने १४२ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. संकेतला मागे टाकण्यासाठी मलेशियाच्या खेळाडूला तिसऱ्या प्रयत्नात १४२ किलो वजन उचलणं अनिवार्य होतं. ज्यात तो यशस्वी देखील ठरला. ज्यामुळे त्याने थेट सुवर्णपदक मिळवलं असून संकेतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.