(कोलंबो)
कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. सुपर ४ फेरीत भारताने सलग दुसरा विजय नोंदवला. तत्पूर्वी भारताचे आघाडीचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकीसमोर निष्प्रभ ठरले होते.
भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटागंण घातले. भारताने दिलेल्या २१४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अतिशय खराब झाली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत लंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. ७३ धावांत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. निशांका ६, करुनारत्न २, कुशल मेंडिस १५, समरमिक्रमा १७ आणि असलंका २२ धावा काढून तंबूत परतले.
आघाडीची फळी ढेपाळली. त्यामध्ये कर्णधार दासून शनाकालाही डाव सांभाळता आला नाही. त्याला जडेजाने ९ धावांवर तंबूत पाठवले. ९९ धावांत श्रीलंकेने ६ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर धनंजय डीसल्वा आणि वाल्लेलागा यांनी डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण रविंद्र जडेजाने धनंजयला ४१ धावांत बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले. श्रीलंका ४१.३ षटकांत १७२ धावाच करू शकली. वाल्लेलागा ४२ धावांवर नाबाद राहिला. कुलदीपने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर लोकेश राहुलने ३९ धावांचे, इशान किशनने ३३ धावांचे आणि अक्षर पटेलने २६ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने ५ विकेट घेतल्या. तर चरित असलंकाने ४ विकेट घेतल्या. शेवटची विकेट महिष थिक्षनाच्या नावावर होती. भारताच्या सर्व १० विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.