(संगमेश्वर / प्रतिनिधी )
मराठी साधारण समजतेय, हिंदीची जाण आहे आणि इंग्रजी तर समजते व बोलताही येते अशी कोवळ्या वयातील म्हणजे जेमेतेम दहा वर्षांची आदिवासी मुले ‘माडीया’ भाषा बोलणारी. एका पेक्षा एक मोठी चित्र आणि शिल्प पहाताना यातील कुतूहल आणि औत्सुक्य या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते . कलादालनातील कलाकृती पहाताना या मुलांना झालेला आनंद त्यांच्या हालचालीतून आणि माडीया बोलीभाषेतून व्यक्त होत होता . एका भव्य पूर्णाकृती शिल्पाकडे पाहून समोर जिवंत माणूसच बसलाय , असे वाटल्याने ही गोंडस मुले दचकून काहीशी मागेही सरकली . त्यांच्या या दचकण्याने साहजिकच शिल्पात कलाकाराने ओतलेला जिवंतपणा देखील अधोरेखित झाला . भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील हे सारे विद्यार्थी चित्रांच्या दुनियेत एकरुप झालेले पहायला मिळाले .
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील डॉ . प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी संचलित साधना विद्यालय नेलगुंडा येथील सुमारे २७ विद्यार्थ्यांनी आपल्या ०४ शिक्षकांसह व्यापारी पैसा फंड संस्थेने उभारलेल्या पैसा फंड कलावर्ग आणि कलादालनाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत लायन्स क्लब संगमेश्वरचे विवेक शेरे, गुलाम पारेख, अमोल पाटणे, मनीष चोचे, नंदु पटेल, कलांगण संगमेश्वरचे श्रीनिवास पेंडसे, तेजस संसारे आणि संगमेश्वर येथील व्यापारी बांधव यशोधन सैतवडेकर, संकेत खातू , शैलेश बोरसुतकर तसेच श्रीकृष्ण खातू आदि उपस्थित होते . व्यापारी पैसा फंड संस्थेचे कार्यवाह धनंजय शेट्ये , प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी साधना विद्यायातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . संस्थेच्या वतीने कार्यवाह धनंजय शेट्ये यांच्या हस्ते साधना विद्यालयाचे शिक्षक रिकेश आलम यांचा स्मृतिचिन्ह देवून प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पैसा फंडच्या कलाविभागातर्फे साधना विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना पैसा फंड प्रशालेतील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे आणि खाऊचे पॅक भेट देण्यात आले. आपल्याला चित्राची भेट मिळाली आणि हे चित्र आपल्याला घरी घेऊन जाता येणार याचा या मुलांना खाऊच्या पॅक पेक्षा देखील कमालीचा आनंद झाला.
कलावर्गात पैसा फंडच्या विद्यार्थ्यांनी साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले आणि कलावर्गातील चित्रे त्यांच्या सोबत इंग्रजीत संवाद साधत दाखवली . कलावर्गात या विद्यार्थ्यांना पैसा फंडच्या कला विभागातर्फे गेली २३ वर्षे अखंड सुरु असलेल्या कलासाधना या उपक्रमाची माहिती देवून यातील चित्रे दाखविणात आली. कलावर्ग आणि कलादालन पाहिल्यानंतर हे सारे विद्यार्थी प्रशालेच्या प्रार्थनेत सहभागी झाले आणि त्यांनी ‘हिच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे… माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही प्रार्थना गोड आवाजात सादर केली . प्रशालेतील पाचवी आणि सहावी मधील विद्यार्थ्यांसमवेत या विद्यार्थ्यांच्या संवादाचा कार्यक्रमही उत्तम पार पडला. यावेळी दोन्ही प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी समूहगान सादर केले.