(रत्नागिरी)
भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार, कलाकार अमित पेडणेकर यांनी साकारले आहे. हे शिल्प पाहण्याकरिता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शेकडो लोकांनी गर्दी केली. भाट्ये गावच्या सरपंच सौ. प्रीती भाटकर यांनी फीत कापून आणि सागरी सीमा मंचाचे प्रांत सहसंयोजक संतोष सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून या वाळूशिल्पाचे उद्घाटन केले.
महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मे पासून सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, भगूर, नाशिक, मुंबई, पुणे व सांगली येथे या सप्ताहानिमित्त सावरकरांचा विचार पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रत्नागिरीत वाळूशिल्पाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.
या वाळूशिल्पामध्ये वीर सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर, पतितपावन मंदिर, मोरया बोट साकारण्यात आले आहे. हे वाळूशिल्प अतिशय सुरेख साकारल्याबद्दल अनेकांनी मूर्तीकार अमित पेडणेकर यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या वाळूशिल्पाची छबी टिपून घेतली.
वाळू शिल्प उद्घाटनप्रसंगी पतितपावन मंदिर संस्थेचे अॅड. बाबासाहेब परूळेकर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, अॅड. शाल्मली आंबुलकर तसेच ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम वाडकर, सुमेधा भाटकर, पराग भाटकर, रमीजा भाटकर, ग्रामसेवक पाचवे, रमाकांत पिलणकर, प्रमुख मानकरी राजकुमार भाटकर, दशरथ मुरकर, गंगाधर भाटकर, संजीवनी पेडणेकर, राजेश पाटील, मूर्तीकार अक्षय पिलणकर, विजय मुरकर, मनोज पाटणकर, मोहन पटवर्धन, राजेश गावडे आदी उपस्थित होते. सावरकर साईजित शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. तनया शिवलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
२८ ला शोभायात्रा, सहभोजन, मन की बात
सावरकर विचार जागरण सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड यांनी २१ मे पासून सुरू असलेल्या दुचाकी फेरी, रांगोळी प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन याविषयी माहिती दिली. २८ मे रोजी मोठ्या दिमाखात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कारागृह ते पतितपावन मंदिरापर्यंत होणाऱ्या या शोभायात्रेत हजारो सावरकरप्रेमी नागरिक सहभागी होणार आहे. तसेच ८ चित्ररथही आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम मंदिरातून थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. स्वा. सावरकरांची जयंतीला प्रथमच पतितपावन मंदिराची निवड करण्यात आली आहे. या वेळी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हेसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रवींद्र भोवड यांनी दिली.