( पुणे )
पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नव्या उड्डाण पुलांसह रस्त्यांचे सुटसुटीत जाळे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, सातारा आणि कोथरुडकडे जाण्या-या नागरिकांची कसरत कमी होणार आहे. या कामाचे आता उद्या मोठ्या थाटात उद्घाटन पार पडणार आहे. यात या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणा-या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाच डावलले गेल्याने त्यांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून त्याला असे निष्ठावंतांचं डावललं जिणं असा मथळा दिला आहे. यातूनच त्यांना काय म्हणायचे हे प्रतित होते. माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही… पण आता दु:ख मावत नाही मनात… वाटलं बोलावं तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली आणि खूप वाईट वाटले.
चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी, स्वत: आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णीताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला. पण सध्याच्या नेत्यांना सर्व श्रेय पाहिजे, असे दिसते.
माझे अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न
अनेक असे संदर्भ देता येतील की, ज्यात कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते या विषयी सहभागी नव्हते. तेव्हापासून मी सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सध्याचे नेते…माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नांत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.