(मुंबई)
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहेत. अशीच एक महत्वाची घडामोड नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या मालेगाव बा. मधील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे बळ मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात हिरे कुटुंबाला राजकारणात मोठं वलय आहे. माजी महसूल मंत्री सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब हिरे यांचे ते पणतू आहेत. तर माजी परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचे ते पुत्र आहेत. नाशिकचे पालकमंत्री आणि मालेगाव बा. चे आमदार दादा भुसे यांची अद्वय हिरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात नाकेबंदी करण्याची शक्यता आहे. अद्वय हिरे यांच्या रुपात संघटनात्मक जाळे असलेले आणि कार्यकर्त्यांचे चांगले नेटवर्क असणारा नेता ठाकरे गटाला मिळाला आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्या मालेगाव बा. मतदारसंघात उद्धव ठाकरे अद्वय हिरे यांना संधी देऊन बंडाचा हिशोब चुकता केला जाण्याची शक्यता आहे.
अद्वय हिरे यांनी यापूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ५० हजारांहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे नांदगाव, मालेगाव, सटाणा कळवण, मालेगाव बा. या विधानसभेत प्रभाव पाडण्याची क्षमता अद्वय हिरे यांच्यामध्ये आहे. ठाकरे गट अद्वय हिरे यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करेल, असे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात आले आहे.