(मुंबई)
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच हा थरारक प्रकार घडला. महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे.
मागील काही काळापासून कल्याण आणि परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय वाद सुरू आहेत. आजही, शुक्रवारी (2 फेब्रुवारी) एका वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात बैठक सुरू होती. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाले. हा वाद वाढल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोळीबाराच्या घटनेत महेश गायकवाड हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला जखम झाल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर महेश गायकवाड जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. शुक्रवारी गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितलं. माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला, अशी कबुलीच गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली. त्याचवेळी मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही, असंही बेमालूमपणे त्यांनी सांगितलं. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत.
गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यामुळे रूग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही रुग्णालयाला भेट दिली.