(संगमेश्वर)
तालुक्यातील पिरंदवणे गावातील सदानंद हरिश्चंद्र गुरव यांना पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. मात्र काही सहहिस्सेदारांनी या घरकुलास संमती न दिल्याने जि.प. रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने नवीन जागेचा प्रस्ताव करून नव्या स्वमालकीच्या जागेत घरकुल बांधण्यासाठी प्रस्ताव केला. मात्र याठिकाणीही काही लोकांनी मा. उच्च न्यायालयात केस करून प्रशासनावर दबाव आणला. इतकेच नाही तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थगिती देण्यासाठी भाग पाडले.
यादरम्यान घडलेल्या घटना भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या कानावर येत होत्या. त्यांच्याच सल्ल्याने ग्रा.पं. डिंगणीचे उपसरपंच तसेच भाजपाचे युवा नेतृत्त्व मिथुन निकम यांनी लाभार्थी परिवारास भेट दिली. यावेळी लाभार्थी सदानंद गुरव, त्यांच्या पत्नी चंपाबाई गुरव, ग्रामस्थ विनोद गुरव, गावचे मानकरी व तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद मुळे उपस्थित होते. यावेळी भाजपा कार्यकर्ते योगेश मुळे यांनी सर्व परिस्थिती निकम यांच्यासमोर विषद केली.
मिथुन निकम म्हणाले, “केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवणे प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. या हक्कासाठी लढणाऱ्या गुरव परिवाराला संगमेश्वर भाजपा सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच स्थानिक असलेले भाजपा पदाधिकारी योगेश मुळे यांच्या पाठीशी आम्ही समर्थपणे उभे आहोत. केंद्र सरकारच्या लाभार्थींना विनासायास लाभ मिळण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आता सदानंद गुरव परिवाराने काळजी करू नये.”