(मुंबई)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून देतील असे खुलासे केले आहेत. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेले अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा करतानाच भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते, असा दावा या पुस्तकातून पवारांनी केला आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये अंतर का वाढले, त्यामागचे कारण आणि त्यातच असलेली महाविकास आघाडीच्या जन्माची कहाणी पवारांनी यात सांगितली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवसेना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019 नंतर चित्र बदलले. 2019 मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या.
राज्यातील 50 मतदारसंघांत बंडखोरांचे आव्हान होते. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशिर्वादाने आणि पक्षाच्या बळावर होते, असे शरद पवार यांनी पुस्तकात म्हटले आहे. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचे प्रतित होत होते. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणे कायम होत्या. भाजप आणि शिवसेना यांच्या संवादाची गरज असे तेव्हा शीर्षस्थ नेतृत्व मातोश्रीवर येऊन संवाद घडवत असे. पण बदलेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची भाजपच्या नेत्यांकडून मातोश्रीवर येऊन संवाद घडवावा हीच अपेक्षा कायम होती.
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचे उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करण्यात येणार नाही असा सरळ राजकीय हिशोब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, याविषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. मात्र सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही, पण आग धुमसत होती,’ असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.