(चिपळूण)
सामान्य लोकांना विकासापासून अलिप्त ठेवून भाजप भांडवलशाहीचा उदोउदो करीत आहे. इतकेच नव्हे तर ईडी सारख्या शासकीय यंत्रणाचा गैरवापर शिवाय बड्या उद्योजकांची कर्जमाफी करताना कोट्यावधींचा घोटाळा केला जातोय. केंद्र सरकार विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात असून केंद्रातील या सत्ताधारी भाजपाने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत देशातील लोकशाही धोक्यात आणली, असे मत डॉ. विश्वंभर चौधरी, ऍड. असिम सरोदे यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात ‘निर्भय बनो’ विषयी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मार्गदर्शन करताना, त्यांनी राज्य व केंद्र सरकारविषयी सडकून टीका केली. डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बड्या उद्योजकांना शेकडो कोटीची कर्जमाफी दिली जाते. विरोधी पक्ष असावा ही पंडित नेहरूंची इच्छा होती. असे असताना मात्र पैशाचा वापर आणि शासकीय यंत्रणांचा धाक दाखवून आता विरोधी पक्षात क फोडाफोडी राजकारण सुरु आहे. पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमचा विरोध नाही तर त्यांच्यातील भुमिकेला विरोध आहे.
या हुकुमशाही सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेने बोलायला हवे. त्यांच्यात याविषयी जागृती व्हायला हवी. देशातील सर्व समाज घटक प्रभू रामचंद्राला मानत असला तरी केंद्र सरकारने राम मंदिरा आडून केलेल राजकारण वाईट आहे. राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनाला का टाळले, तसेच देशात फाळणी दिन साजरा केला जातोय, हे दुर्दैव आहे. देशात माध्यम स्वातंत्र्य राहीलेले नाही. सरकारच्या कृत्यामुळे देशात सार्वभौमत्व शिल्लक राहीलेले नाही असा आरोपही चौधरी यांनी केला.
ऍड. असिम सरोदे म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात असून एकाधिकारशाहीची वाटचाल सुरू आहे. विकासाची टिमकी मिरवणाऱ्या या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेतलेल्या नाहीत. या निवडणूका न घेणे म्हणजे अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. देशात लोकशाहीचा गैरवापर करून जे महत्वाचे नाहीत त्यांना मोठे महत्व दिले जातेय. तसेच अनेक मुद्दे उपस्थित करत सरकारची पोलखोल केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ऍड. किशोर वरद यांनी केले.