(मुंबई)
अभिनेत्री भाग्यश्री हिच्या मुंबईच्या घरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. २०१४ साली भाग्यश्रीच्या विलेपार्ले येथील घरी चार व्यक्तींनी मिळून तब्बल २५ लाखांची चोरी केली होती. या घरी भाग्यश्रीचे सासू- सासरे राहत होते. त्यांच्यावर विषप्रयोग करून घरात चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. गेली ५ वर्ष त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू होती.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यातील एकाही आरोपीचा चेहरा ओळखू शकले नाहीत. आरोपींची ओळख न पटल्याने पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
२४ जानेवारी २०१४ रोजी भाग्यश्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकरासह चारजणांनी मिळून भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना त्यांच्याच घरी विष पाजून लाखो रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन पलायन केले होते. या घटनेत त्यांचा जीव वाचला. मात्र, २५ लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर जुहू पोलिसांनी २ आरोपींना अटक केली. मात्र इतर २ आरोपी तेव्हापासून फरार होते. २०१८ मध्ये ठाण्यातील वसंत विहार येथून दोन चोरट्यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यावेळी २०१४ मधील या चोरीच्या घटनेचीही त्यांनी चौकशीत कबुली दिली होती. मात्र न्यायालयाने त्यांना निर्दोष असल्याचे म्हणत पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.