(खेड / भरत निकम)
मुंबई गोवा महामार्गावरील भरणे ग्रामपंचायत क्षेत्रातील महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अपुरी असलेली कामे पूर्ण करून देण्यासाठी भरणे ग्रामपंचायती मार्फत तब्बल सहा पत्रे देऊनही त्याची दखल न घेतल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांना देण्यात आले आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कायम वर्दळीचा भाग असलेल्या भरणे नाका येथे नेहमीच वाहतूक कोंडी, छोटे मोठे अपघात याचे प्रमाण वाढले आहे. या बाबत ग्रामपंचायतीच्या वतीने पेण येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार करुन सुध्दा कोणतीही दखल घेण्यात आली नाही. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रारी मांडल्या होत्या. सद्यस्थितीत भरणेनाका येथे नवभारत हायस्कुल समोर शाळेत जाणाऱ्या मुलांना ओव्हर ब्रिज उभारणे, प्रवाशांसाठी सार्वजनिक सुलभ शौचालय, प्रवाशी निवारा शेड, सर्व्हिस रोडची लांबी व रुंदी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराची उंची ही रस्त्यापेक्षा जास्त असल्याने ग्राहकांना व व्यापाऱ्याना तसेच वाहनचालकांना गाडी पार्किंग करण्यास अडथळा निर्माण होत आहे. भरणे येथे महामार्गालगत पादचाऱ्यांसाठी फुटपाथची आवश्यकता असल्याने त्याची उभारणी, नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नियोजन आदी कामांची लवकरात लवकर पूर्तता करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करन्यात आली आहे. खवटी ते परशूराम या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम जवळ पास पूर्ण झाले असले तरी भरणे येथे चिपळुणच्या दिशेने येताना खेड शहराकडे वळण्याचे ठिकाण धोकादायक ठरले आहे.
भरणे नाका येथील अपुर्ण कामे व त्रुटींबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा,चर्चा करुनही संबधीत विभागाकडून ग्रामपंचायतीच्या पत्राकडे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थानी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.