(गांधीनगर)
चहासाठी प्रसिद्ध असलेल्या वाघ बकरी समूहाचे संचालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचावाच्या प्रयत्नात मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकला गेले असता भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. बचावाच्या प्रयत्नात ते खाली कोसळले आणि डोक्याला झालेल्या दुखापतीत उपचारांदरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पडून त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता आणि रविवारी त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रसिध्द वाघ बकरी समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे काल निधन झाले. त्यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी अहमदाबादच्या एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी देसाई घराजवळील इस्कॉन रोड परिसरात प्रभातफेरीला गेले होते. इस्कॉन रोडवर काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना ते जमिनीवर कोसळले.
जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांची तब्येत जास्तच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी हेबतपूर रोडवरील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात हलवले.त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवले होते. मात्र त्यांची प्रकृती नाजूक होती. रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पराग देसाई हे वाघ बकरी टी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रासेश देसाई यांचे पुत्र होते. ३० वर्षांहून अधिक काळात देसाई यांनी कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. या कंपनीची उलाढाल १,५०० कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच देसाई हे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचा (CII) भाग होते. वाघ बकरी वेबसाइटवर देसाई यांचा उल्लेख “एक टी टेस्टर एक्सर्प्ट आणि मूल्यमापनकर्ता” असे केले आहे. त्यांनी अमेरिकेतील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधून एमबीए शिक्षण घेतले आहे.
प्राणीप्रेमी देसाईंच्या मृत्यूला कुत्रीच ठरली कारणीभूत
देसाई यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहेत. तर अनेक प्राणीप्रेमींनी देसाई स्वतःच प्राणीप्रेमी होते आणि त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी मोठी मदत केली होती, ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. र देसाई हे स्वतःच प्राणीप्रेमी होते असे हेल्पिंग हूक्स या संस्थेने म्हटले आहे. या संस्थेच्या प्रमुख अॅनी ठाकूर म्हणतात, “वाघबकरी या कंपनीच्या वतीने जीवदया या ट्रस्टला भटक्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी दोन व्हॅन भेट देण्यात आल्या होत्या.” देसाई यांनी भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या जीवदया या संस्थेला नेहमी सहकार्य केले होते. ठाकूर म्हणतात, “देसाई स्वतः प्राणीप्रेमी होते. त्यांच्या निधनाबद्दल आम्हालाही दुःख झाले आहे. पण या घटनेचा वापर प्राण्यांबद्दल तिरस्कार पसरवण्यासाठी होऊ नये.”