(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने कैलासवासी राजेश रघुनाथ भोसले व कैलासवासी सुनील रघुनाथ भोसले यांच्या स्मरणार्थ खास नवरात्र उत्सवानिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा १८ ऑक्टोबर रोजी रात्री श्री भैरी भगवती मंदिर भगवतीनगर येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेत एकूण आठ नामांकित ढोल पथक संघांनी सहभाग घेतला होता.यावेळी या स्पर्धेला भगवतीनगर पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सागर भोसले पुरस्कृत झालेल्या या ढोलवादन स्पर्धेत प्रथम क्रमांक वायंगणीच्या ओमसाई संघाने पटकावला तर द्वितीय क्रमांक चिंचखरी येथील सांब रवळनाथ संघाने पटकावला. तर तृतीय क्रमांक नवलाई पावणाई आंबेशेत संघाने संपादन केला.तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट वेशभूषाचे बक्षीस शिवगर्जना नाचणे ढोल पथकाने प्राप्त केले. तर उत्कृष्ट ढोलवादक ओमसाई वायंगणी संघाचा रितेश सालम तर उत्कृष्ट ताशावादक शिवगर्जना नाचणे ढोल पथकाचा ऋतिक बाणे आदींना आकर्षक चषक व रोख रक्कमेची बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या ओमसाई वायंगणी ढोल पथकाला रोख रुपये 7000 व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय विजेत्या सांब रवळनाथ चिंचखरी ढोल पथकाला आकर्षक चषक व रोख रक्कम ५००० देऊन सन्मानित करण्यात आले तर तृतीय क्रमांक विजेत्या नवलाई पावणाई आंबेशेत ढोल पथकाला रोख रक्कम ३००० व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भगवतीनगर येथील भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने व सागर भोसले पुरस्कृत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला . ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भगवतीनगर येथील श्री भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सागर भोसले पुरस्कृत मित्र मंडळाने विशेष मेहनत घेतली.