(वैभव पवार, गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा विवेक परकर यांना आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता हॉटेल दर्यासारंग पॅलेस गणपतीपुळे एसटी स्टँड जवळ तालुका जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहे.
वृंदा परकर या सप्टेंबर 1983 पासून
प्राथमिक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत कार्यरत आहेत. तसेच एकूण 38 वर्षे त्यांनी शिक्षकी सेवेत सेवेत नोकरी केली असून दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी त्या सेवानिवृत्त होणार आहेत. त्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भंडारपुळे येथे कार्यरत असून त्यांनी शालेय मुलांचा बौद्धिक व सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवून शालेय मुलांना आदर्श नागरिक घडवण्याच्या दृष्टीने आपली घौडदौड चालू ठेवली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी विधायक गुणांचे अनुकरण व्हावे,या दृष्टीने त्यांनी शिक्षण देण्याचे काम केले आहे त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन सामाजिक , शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी 2022 च्या जयंती निमित्ताने गणपतीपुळे येथे प्रतिवर्षाप्रमाणे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वृंदा परकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यावेळी अविष्कर फौंडेशन संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व मान्यवर व पुरस्कारप्राप्त व्यक्तीनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर संस्थेचे संस्थापक व इतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने वृंदा परकर यांचे संपूर्ण भंडारपुळे ग्रामस्थ व पालकांकडून तसेच मालगुंड परिसरातील शिक्षणप्रेमी व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.