( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यात 15 डिसेंबर पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी काढले आहेत. नियम मोडल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी सिंह यांनी काढलेल्या प्रेस नोट मध्ये म्हंटले आहे की, सध्या दुचाकी धारकांचे मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेता सर्व नागरिकांच्या स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षितपणे प्रवासासाठी, जनजागृती व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत घेण्यात आला आहे. त्या निर्णयाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व दुचाकी वाहनांवरून प्रवास करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त दुचाकीवरुन कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना तात्काळ हेल्मेट सक्ती करणे आवश्यक आहे. १५.१२.२०२२ रोजी पासून संपूर्ण जिल्हयामध्ये दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती करणेबाबतचा निर्णय मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९ अन्वये घेण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांतील विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी आपल्या आस्थापनेवरील दुचाकी वाहनांवरुन प्रवास करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त दुचाकीवरुन कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे फलक कार्यालयाचे प्रवेशद्वार व कार्यालय आवारात प्रदर्शित करण्यात यावेत. तसेच दि. १५.१२.२०२२ रोजी पासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुचाकी वाहन चालकांना वाहन चालविताना हेल्मेट सक्तीचे करण्यात येत आहे.
वरील गुन्हयांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९४ (ड) नुसार रु. १०००/- इतका दंड आकारण्यात येईल, याची सर्व सर्व शासकीय / निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.
दंड घेऊन त्यांना हेल्मेट वाटपही केले तर पुढचा प्रवास ही सुखी होईल.