( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील नांदगाव भुवडवाडी येथे पूर्व वैमनस्यातून चुलत भावानेच भावाचा खून केल्याची घटना सोमवार 6 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या खून प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र भुवड (44, नांदगाव भुवडवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. सुरेश केशव भुवड (45, नांदगाव, भुवडवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मयत सुरेश भुवड याला दारूचे व्यसन होते. या व्यसनातून तो महेंद्र भुवड याच्या घरच्यांना, आई वडिलाना शिवीगाळ करत असे. हे दोघे नात्याने चुलत भाऊ आहेत. घरात दंगा करणे याला महेंद्र व त्याचे कुटुंब कंटाळले होते. सोमवार 6 फेब्रुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. सुरेश हा महेंद्र याना शिवीगाळ करत होता. यावेळी महेंद्र याला राग आल्याने सततच्या शिवीगाळला तो कंटाळला होता. त्याने एका दांडक्याने सुरेश याला मारहाण केली. आणि त्याच्या डोक्यात दंडुका घातला. वर्मी घाव लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत सुरेश खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या महेंद्र याने तेथून पळ काढला. या घटनेची खबर पोलिसाना देण्यात आली. रात्री सावर्डे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महेंद्र याला अटक करून पोलिस स्थानकात आणण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दोघांच्याही वादाचे प्रकरण अनेक वेळा पोलिस स्थानकापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आला असावा असे बोलले जात आहे.