(फुणगूस/इकबाल पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावात अखेर एसटी बस सुरू झाली असून सोमवारपासून एसटी बसफेरीला सुरूवात झाली आहे. गावात बसफेरी सुरू व्हावी, यासाठी गावच्या सरपंच सोनल चव्हाण यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
बोंड्ये गाव हा दुर्गम भागात येतो. पुर्वी या गावात जाण्यासाठी बावनदीवर लोखंडी पूल होता. या पूलावरूनच गावातील ग्रामस्थ ये-जा करीत असत. हा पूल एकप्रकारे दळणवळणाचे साधन होता. या पूलावरून केवळ ग्रामस्थांना ये-जा करता येत होती. पावसाळ्यात तर ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात गावात कोणतेही वाहन नेता येत नव्हते. मात्र वांझोळे बावनदीमार्गे कासारकोळवण येथून बोंड्ये गावात जाण्यासाठी रस्ता असल्याने या मार्गावरून वाहन जात होते. परंतु हा मार्ग वळसा मारून येणारा व लांबचा असल्याने केवळ वाहनाने प्रवास करण्यापुरता या मार्गाचा ग्रामस्थ अवलंब करत होते. इतर वेळी बोंड्ये गावातील बावनदीवर असणाऱ्या लोखंडी पूलाचा आधार ग्रामस्थ कामानिमित्त घेत असत. कालांतराने हा पूल जूना झाल्याने तो दळणवळणासाठी धोकादायक बनला होता.
यानंतर या पूलाच्या जागी मोठा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करीत होते. अखेर ग्रामस्थांच्या मागणीला यश येवून बावनदीवर काही वर्षांपुर्वी मोठा पूल उभारण्यात आला. व खडतर प्रवासातून ग्रामस्थांची सुटका झाली. या पूलावरून दुचाकी, चारचाकी वाहने गावात जाऊ लागली. मात्र देवरूखमध्ये कामानिमित्त बसने प्रवास करण्यासाठी ग्रामस्थांना काही अंतर चालत येऊन देवरूख-मार्लेश्वर मार्गावर असणाऱ्या बोंड्ये गावच्या बसथांब्यावर यावे लागत होते. बसथांब्यावर येण्यासाठी अंतर खूप असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता.
अखेर गावच्या तरूण तडफदार सोनल चव्हाण या सरपंच झाल्यावर त्यांनी गावात विकासकामे करत ग्रामस्थांची बसची अडचण लक्षात घेऊन गावात बसफेरी सुरू व्हावी यासाठी स्वतः पुढाकार घेतला व प्रयत्न सुरू केले. यासाठी त्यांनी देवरूख एसटी आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांची भेट घेऊन बोंड्ये गावात एसटीची बसफेरी सुरू व्हावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच याकामी त्यांना राज्यपाल सन्मानित गुणवंत पुरस्कार प्राप्त एसटीचे देवरूख आगारातील सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक विजयराव शिंदे व वाहतुक निरीक्षक अजित सावंत, उपसरपंच संदेश कात्रे, सर्व ग्रा. पं. सदस्य यांचे चांगल्याप्रकारे सहकार्य मिळाले.
बोंड्ये सरपंच सोनल चव्हाण यांनी गावात बसफेरी सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे देवरूख आगारव्यवस्थापक राजेश पाथरे यांना निवेदन दिल्यानंतर तातडीने यावर विचार होवून गावात सोमवारपासून बसफेरी सुरू करण्यात आली आहे. या बसफेरीमुळे ग्रामस्थांची अडचण दूर झाली आहे. ही बसफेरी सरपंच सोनल चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरू झाली असून ग्रामस्थांनी सरपंच सोनल चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे. सोमवारी बोंड्ये गावात बस आल्यानंतर गावातील सुवासीनींनी बसचे औक्षण केले. यावेळी सरपंच सोनल चव्हाण, माजी सरपंच ललीता गुडेकर, ग्रामसेवक राजेंद्र पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मोर्डेचे माजी सरपंच प्रदीप ढवळ आदिंसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सोनल चव्हाण यांनी देवरूख एसटी आगार प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गावात बसफेरी सुरू झाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.